रामेश्वर काकडे
नांदेड : शुक्रवारी सायंकाळी शहर व परिसरात झालेल्या जोरदार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे कौठा येथील मोदी ग्राऊंडवर पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी आलेल्या भाविकांची मोठी पंचाईत झाली. सभामंडपात पावसाचे पाणी शिरल्याने एकच धांदल उडाली. त्यानंतर तेथील भाविकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने एसटी बस व अन्य खासगी वाहनांद्वारे रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चार हजार भाविकांना इतरत्र सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. सायंकाळपासून सातत्याने रात्री उशिरापर्यंत दमदार पाऊस सुरू होता. या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवरही पाणी साचले होते.
कौठा येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण सभामंडळात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने भाविक-भक्तांची मोठी पंचाईत झाली. काही वेळातच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी यांची ६५ जणांची महसूल विभागाची टीम अवघ्या २० मिनिटांत सभास्थळी दाखल झाली. यावेळी तेथील वृद्ध, महिला, बालके यांना एसटी महामंडळाच्या पाच बसेस तसेच खासगी बसेसद्वारे, नागार्जुन स्कूल, ओम गार्डन येथे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
रात्री साडेअकरा वाजेपर्यंत जवळपास चार हजारांपेक्षा अधिक भाविकांना इतरत्र हलविण्यात आले. उर्वरित भाविकांसाठी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या कामी पोलिस विभाग, मनपा यांचा समन्वय साधत, अधिकारी वर्ग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. या ठिकाणी सर्पमित्रांच्या टीमलाही पाचारण करण्यात आले होते. सभामंडपाच्या ठिकाणी साचलेले पाण्याला वाट काढून देण्यासाठी घटनास्थळी जेसीबी मशिनही दाखल झाल्या होती.महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथकही दाखल
भाविकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, शहर अभियंता सुमंत पाटील यांच्यासह बहुतांश विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापनाची टीमही कौठा येथील सभामंडपस्थळी दाखल झाली. खासगी वाहनांनी या टीमने चारशे ते पाचशे भाविकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.