येथील गोरक्षकांच्या सतर्कतेने पोलीस स्टेशन इतवारा यांनी जुलै महिन्यात गोवंश जप्त करून श्री साई मंदिर ट्रस्टच्या गोशाळेमध्ये सांभाळण्यासाठी ठेवले होते. त्यानंतर आरोपीने मालमत्ता परत मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केले होते. त्या अर्जावर साई मंदिर गोशाळेने आक्षेप न घेतल्यामुळे देवकृपा गोशाला तथा गोविज्ञान केंद्र यांनी अॅड. जगदीशजी हाके यांच्याद्वारे आक्षेप दाखल केला होता. न्यायालयाने आरोपींचे अर्ज रद्द करून, देवकृपा गोशाला तथा गोविज्ञान केंद्राचे दोन्ही अर्ज मंजूर केले. त्यानंतर सदरील गोवंश साई मंदिर गोशाळेमधून देवकृपा गोशाला तथा गोविज्ञान केंद्र पवना यांना सुपुर्द करण्याचा आदेश पोलीस स्टेशन इतवारा यांना देण्यात आला. त्यानुसार या गोवंशाचे पालन पोषण संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. गोवंश जप्त केलेल्या ९४ पैकी २-३ प्रकरणे सोडली तर बाकी सर्व प्रकरणांत गोशाळेस यश मिळाले आहे. आतापर्यंत गोशाळेच्या प्रयत्नाने ४५० पेक्षा अधिक गोवंशास जिवदान मिळाले आहे. त्यांचे पालन करण्यात आनंद मिळत असल्याची प्रतिक्रिया किरण बिच्चेवार यांनी दिली. यावेळी जिल्हामंत्री शशिकांत पाटील, बजरंग दल महानगर संयोजक गणेश यशवंतकर, बिरबल यादव, गौरव वाळिंबे, महेश देबडवार, प्रमोद भास्के उपस्थित होते.
देवकृपा गोशालेतर्फे ४५ गोवंशांचे पालनपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:19 AM