विशाल सोनटक्के।नांदेड : मोदी आणि शहामुक्त भारतासाठी महाराष्ट्रभर सभा घेण्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी जाहीर केले होते. त्यानुसार ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील पहिली सभा शुक्रवारी नांदेड येथे होत आहे. तब्बल पाच वर्षानंतर राज ठाकरे नांदेडकरांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या सभेबाबत शहरवासियांत कमालीची उत्सुकता असून, मनसेच्या नेत्यांची टीम गुरुवारीच नांदेडमध्ये दाखल झाली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या लोकसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार रिंगणात उतरविलेले नाहीत. मात्र, देश आणीबाणीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे सांगत याबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच पुन्हा नरेंद्र मोदी नको हे सांगण्यासाठीच लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत या सभा घेत असल्याचे महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने स्पष्ट केले आहे.सभेच्या अनुषंगाने मनसेचे नेते आ. बाळा नांदगावकर, अभिजित पानसे यांच्यासह प्रमोद ऊर्फ राजू रतन पाटील, शिरीष सावंत, मराठवाडा संपर्कप्रमुख जावेद शेख, प्रदेश उपाध्यक्ष अशोक तावरे बुधवारीच नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. तर काही पदाधिकारी गुरुवारी नांदेडमध्ये पोहोचले. या सर्वांनी शुक्रवारी होणाऱ्या सभेच्या तयारीचा आढावा घेतला.महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने लोकसभा निवडणूक काळात राज्यात आठ ते नऊ सभा घेण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार शुक्रवारी नांदेड येथील सभा झाल्यानंतर १५ एप्रिल रोजी राज ठाकरे यांची सोलापूर येथे सभा होणार आहे. १६ एप्रिल रोजी इचलकरंजी, १७ एप्रिल रोजी सातारा, १८ एप्रिल रोजी खडकवासला तर १९ एप्रिल रोजी महाड येथे ते जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर मावळ येथेही सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले असून, मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या दोन सभा होतील, असे आ. बाळा नांदगावकर यांनी सांगितले.मागील लोकसभा निवडणुकीत अफाट बहुमत मिळाल्यानंतर एखाद्याने देशाचा चेहरामोहरा बदलून दाखविला असता. परंतु, नरेंद्र मोदी हे चहावाला आणि चौकीदार यापुढे जायला तयार नाहीत. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेची भूमिका खुद्द राज ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. आम्ही कोणाला मते द्या म्हणून या सभा घेत नाहीत. तर नरेंद्र मोदींमुळे देशाचे कसे वाटोळे झाले? ते जनतेपुढे यावे, या देशहिताच्या हेतूनेच या सभा घेत असल्याचेही आ. नांदगावकर म्हणाले.दरम्यान, राज ठाकरे यांच्या या सभेच्या अनुषंगाने मनसेतर्फे विभागनिहाय जबाबदारी सोपविण्यात आली असून, मराठवाड्यात राजू पाटील आणि अभिजित पानसे, विदर्भ- हेमंत गडकरी, कोकण-शिरीष सावंत आणि नितीन सरदेसाई, उत्तर महाराष्टÑ जयप्रकाश बावीस्कर, मुंबई दक्षिण- अविनाश अभ्यंकर तर पश्चिम महाराष्टÑातील जबाबदारी बाळा नांदगावकर आणि अनिल शिदोरे सांभाळत आहेत.काय आणि कोण असेल?राज ठाकरेंच्या निशाण्यावरगुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपावर शरशंधान साधले होते. या सभेची राज्यभरात चर्चाही झाली. या सभेत नोटाबंदीसह जीएसटीच्या मुद्यावर त्यांनी आकडेवारी आणि विविध दाखले देत भाष्य केले होते. आता नांदेडमध्ये होणाºया सभेत ते काय बोलणार ? याबाबत उत्सुकता आहे. राफेल कराराबाबतच्या तक्रारी अनुषंगाने पुनर्विचार करण्याचा न्यायालयाचा निर्णय, नरेंद्र मोदी यांच्या चित्रपटाला मिळालेली स्थगिती याबरोबरच जळगाव येथे भाजपाच्या दोन गटांत झालेली फ्रीस्टाईल यावरही राज ठाकरे खास त्यांच्या शैलीत भाष्य करण्याची शक्यता आहे.प्रझेंटेशनसाठी व्यासपीठावर राहणार दोन स्क्रिन२०१४ च्या निवडणूक प्रचारावेळी राज ठाकरे यांनी नांदेड येथील नवामोंढा मैदानावर प्रचारसभा घेतली होती. त्यानंतर साधारणत: पाच वर्षानंतर राज ठाकरे हे पुन्हा त्याच ठिकाणी सभा घेत आहेत. सभेच्या निमित्ताने ठाकरे यांचे सकाळी नऊच्या सुमारास देवगिरी एक्स्प्रेसने नांदेडमध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता या सभेला सुरुवात होईल. सभेच्या अनुषंगाने मोंढा मैदानावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्याप्रमाणेच या सभेतही मंचावर दोन स्क्रिन असणार आहेत. भाषणाबरोबरच या स्क्रिनवर ते सादरीकरणही करणार आहेत.
देशातील वास्तव परिस्थितीबाबत स्पष्ट आणि परखडपणे बोलण्याची आवश्यकता आहे. तेच काम आमचे नेते राज ठाकरे करीत आहेत. या सभेच्या माध्यमातून मराठवाड्यात मनसेची पुनउर्भारणी होण्यासही बळ मिळेल. - आ. बाळा नांदगावकर
नरेंद्र मोदी यांच्याकडून सध्या देशभरात सोशल हिप्नॉटिझमसारखा प्रकार सुरु आहे. राज ठाकरे प्रझेंटेशनद्वारे पुराव्यासह भाष्य करीत असल्याने नागरिकांना वास्तव स्थिती स्पष्ट होईल. -अभिजित पानसे, मनसे नेता.