नांदेड : नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत असलेल्या नांदेड, हिंगोली, यवतमाळ व परभणी जिल्ह्यातील लहान-मोठ्या १४४ प्रकल्पांमध्ये आजघडीला ११०४.५६ दलघमी म्हणजे ४०.१४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
गेली काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्याने भूगर्भातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. नांदेड जिल्ह्यातील एकूण १०४ प्रकल्पांची पूर्णजल क्षमता ८०६.६४ दलघमी इतका असून, सद्य:स्थितीला २५०.४२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ३४.३९ इतकी आहे. तर, हिंगोली जिल्ह्यातील ३१ प्रकल्पांची पूर्ण जलक्षमता १२४९.६९ दलघमी असून, सद्य:स्थितीला ३५४.३० दघमी, तर ३६.३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणाची जलक्षमता १२७९ दलघमी असून, सद्य:स्थितीत ४९४.७९ दलघमी म्हणजे ५१.३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. याशिवाय परभणी जिल्ह्यातील आठ प्रकल्पांची जलक्षमता ११२.४५ दलघमी असून, सध्या १४.०५ दलघमी म्हणजे १२.८२ टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. वाढत्या तापमानाने धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने एप्रिल अखेर तसेच मे महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.