लक्ष्मण तुरेराव।धर्माबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालानंतर आता सभापतीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. भावी सभापतीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे २६ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या अनुषंगाने सुरु असलेल्या हालचाली पाहता धक्कादायक निकालाची शक्यता वर्तविली जात आहे.बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ, काँग्रेस पक्षाचे चार, भाजपचे दोन, शिवसेना एक व व्यापारी व हमाल-मापाडी असे तीन अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी स्पष्ट बहुमतासाठी आणखी दोन सदस्यांची गरज आहे. राष्ट्रवादीतून माजी सभापती दत्तात्रय पाटील चोळाखेकर यांच्या पत्नी गोदावरीबाई दत्तात्रय कदम व माजी उपसभापती रामचंद्र पाटील बन्नाळीकर या दोघांची नाव चर्चेत आहेत़ यामुळे या दोघांत कोणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता आहे.दरम्यान, धक्कादायक समीकरण पुढे येत असल्याने राष्ट्रवादीच अडचणीत सापडते की काय? अशी चर्चा आहे. काँग्रेसचे चार, भाजपचे दोन, शिवसेना एक व अपक्ष तिघांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे समजते. यात माजी सभापती भाजपचे गणेशराव पाटील करखेलीकर व काँग्रेसचे तालुका बुथ प्रमुख गोविंद पाटील जाधव या दोघांची नावे चर्चेत असून या दोघांनी प्रत्येकी अडीच अडीच वर्षांचा कारभार पहावा असे गणीत बांधले जात असल्याचे समजते. काँग्रेस व भाजप खरेच एकत्र येतील का ? हाच खरा प्रश्न आहे.गणेशराव पाटील करखेलीकर यांनी काँग्रेसवर नाराजी दर्शवून भाजपात प्रवेश केला. आणि निवडणूक लढवली आहे. ते आता काँग्रेसशी हातमिळवणी करतील का? याबाबतही चर्चा रंगत आहे. असे झाले तर राष्ट्रवादीचे सर्वाधिक आठ सदस्य येऊनही पक्षाला विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी लागेल.गणेशराव पाटील करखेलीकर यांचा चाळीस वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे ते कसे डावपेच टाकतात ते महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या हालचालीकडे राष्ट्रवादीचे विनायकराव कुलकर्णी लक्ष ठेवून असून राष्ट्रवादीचा ताबा आपल्या हातून सुटणार नाही, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
धर्माबाद बाजार समिती सभापती पदासाठी रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:14 AM
भावी सभापतीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे २६ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या अनुषंगाने सुरु असलेल्या हालचाली पाहता धक्कादायक निकालाची शक्यता वर्तविली जात आहे.
ठळक मुद्दे२६ नोव्हेंबरला निवड धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता