नांदेड : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी कशाप्रकारे दर आकारावेत याची नियमावली शासनाने घालून दिली आहे़ त्यामुळे ऐन दिवाळी, उन्हाळी सुट्यांत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची होणार आर्थिक लूट थांबणार आहे़ ट्रॅव्हल्सचालकांच्या मनमानीविरोधात आता प्रवाशांना अधिकृत क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे़नांदेड येथून पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर आणि कोल्हापूर मार्गावर धावणा-या ट्रॅव्हल्सची संख्या मोठी आहे़ त्यात दिवाळी, महालक्ष्मी, गौरी पूजन आणि उन्हाळी सुट्यांमध्ये मोठी वाढ होते़ पुण्याला दिवाळीच्या सुट्यांमध्ये दोनशेहून अधिक ट्रॅव्हल्स दररोज धावतात़ परंतु, प्रवाशांची गर्दी आणि गरज लक्षात घेवून खासगी ट्रॅव्हल्सचालक तिकिटांमध्ये तीन ते चार पट वाढ करून प्रवाशांची सर्रास लूट करीत असतात़ वातानुकूलित गाडी नसताना तशाप्रकारचे भाडे आकारले जाते़ मात्र, यापुढे प्रवाशांना अधिकृतपणे तक्रार नोंदविता येणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे़शासनाने प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दर किलोमीटरनुसार ठरवून दिले आहे़ त्यापेक्षा जादा भाडे आकारणा-या ट्रॅव्हल्स कंपनीविरोधात प्रवाशांना टोल फ्री क्रमांक ०२२-६२४२६६६६ या क्रमांकावर अथवा प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर आॅनलाईन तक्रार नोंदविता येवू शकते़ शासनाने ठरवून दिलेल्या प्रतिकिलोमीटरच्या दरावरून अंदाजित नांदेड येथून लागणारे भाडे काढले आहेत़ यामध्ये थोड्याफार प्रमाणात कमी-जास्त भाडे होवू शकते़ यामध्ये नांदेड येथून परभणीमार्गे पुणे एसी स्लिपरसाठी १४८१ रूपये, परळीमार्गे पुणे- १४६५ रूपये तर लातूरमार्गे पुणे- १५५० रूपये असे तिकीट दर आकारता येवू शकतात़ तर निमआराम एसी गाडीसाठी १००० ते ११०० रूपयांपर्यंत तिकीट घेता येवू शकतात़ तसेच नांदेड - नागपूर निमआराम सिटींग गाडीसाठी ८०० ते १०० रूपये आणि स्लिपर एसीसाठी ११०० ते १३०० रूपये, नांदेड - कोल्हापूरसाठी सिटींग ११०० रूपये तर स्लिपरसाठी १५०० ते १६०० रूपये आणि मुंबईसाठी सिटींग १३०० ते १३५० रूपये आणि स्लिपर एसी गाडीसाठी १९०० ते २००० रूपये तिकीट गर्दीच्या कालावधीत आकारता येवू शकतात़ परंतु, यापुढे ट्रॅव्हल्सचालकांच्या मनमानीवर लगाम बसेल़
- नांदेड येथून पुणे, कोल्हापूर, नागपूर या मार्गावर शिवशाही बसेस सोडल्या आहेत़ त्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत़ यामध्ये नागपूरसाठी ७४० (सिटींग), ९७५ (स्लिपर), नांदेड - पुणे ९५० (सिटींग) तर स्लिपरसाठी १२४५ रूपये, कोल्हापूर - ९७५ (सिटींग), १२७५ (स्लिपर) तर सोलापूरसाठी सिटींग गाडीसाठी ५२० रूपये तिकीट आहे़
- प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ट्रॅव्हल्सच्या अवाजवी भाडेवाढीवर अंकुश ठेवण्याबरोबर सुविधांची तपासणी करणे गरजेचे आहे़ ब-याच गाड्यांमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र, सिट बेल्ट आदी आवश्यक बाबी नसतात़
- नांदेडचे हजारो विद्यार्थी शिक्षण, नोकरीनिमित्त पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे वास्तव्यास आहेत़ त्यामुळे दिवाळीत गावी येणाºयांचे प्रमाण मोठे असते ही बाब लक्षात घेवून पुणे, मुंबईसाठी दिवाळीत विशेष रेल्वे, बसेस सोडणे गरजेचे आहे़