बुधवारी सार्वजनिक आरोग्य विभागाने दरकपातीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानुसार आता कोरोना निदानाच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहेत. याबरोबरच रॅपिड अँटिजेन, अँटिबॉडीज तपासणीचे दरदेखील कमी करण्यात आले असून, अँटिजेन चाचणी अवघ्या १५० रुपयांत केली जाणार आहे. कोरोना रोखण्यासाठी कोरोनाचे वेळीच निदान होणे व संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही चाचणी करणे गरजेचे आहे. दर कमी झाल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण अधिक वाढून कोरोना रुग्णांना लवकरात लवकर शोधणे व त्यांना उपचार देणे सोपे होणार आहे, असे चव्हाण या निर्णयाचे स्वागत करताना म्हणाले.
मागील वर्षभरात राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने कमी केले आहे. आतापर्यंत किमान पाच वेळा या चाचण्यांच्या दरात कपात करण्यात आली असून, पूर्वी आरटीपीसीआर चाचणीसाठी ४५०० रुपये द्यावे लागत होते. आता हेच दर केवळ ५०० रुपयांवर आले आहेत. राज्य शासनाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, खासगी प्रयोगशाळांना हे दर बंधनकारक असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
बुधवारी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आरटीपीसीआर चाचणीचा नमुना प्रयोगशाळेत येऊन दिल्यास ५०० रुपये, रुग्णालय, कोविड केअर सेंटर, क्वारंटाइन सेंटरमधील प्रयोगशाळा येथे नमुना दिल्यास ६०० रुपये, तर रुग्णाच्या घरी जाऊन चाचणी करायची असल्यास ८०० रुपये आकारले जातील. याच प्रकारे अँटिबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचणीसाठी २५०, ३०० आणि ४०० असे वरीलप्रमाणे तीन टप्प्यांत दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटिबॉडीज या चाचणीसाठी ३५०, ४५०, ५५० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपिड अँटिजन टेस्टसाठी १५०, २०० आणि ३०० असे दर आकारले जाणार आहेत.