ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. या तारखेपर्यंत येणारे सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जाणार असल्याचे कृषी अधीक्षक चलवदे यांनी सांगितले. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणेही आवश्यक आहे. महा-डीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल अथवा, संगणकाद्वारे, सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र आदींच्या माध्यमातून वरील संकेतस्थळावर अर्ज करू शकतील.
अशी करावी नोंदणी
महाडीबीटी पोर्टलच्या संकेत स्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणित करून घ्यावे, आधारशिवाय अनुदान वितरित होणार नाही. शेतकरी मोबाईल, संगणक अथवा सीएससी सेंटर आदी ठिकाणावरून आपली नोंदणी ३१ डिसेंबरपर्यंत करू शकतात. सदर लाभार्थ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
कृषी विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी शासनाने एकच पोर्टल सुरू केले आहे. अर्ज करण्यासाठी केवळ आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेत जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.
शासनाने एकाच ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने आम्हा शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर पैसा वाचणार आहे. परंतु, अर्ज मोठ्या प्रमाणात आल्यानंतर अनुदान देण्यासाठीची रक्कम वाढवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ देणे गरजेचे आहे. शासनाच्या मदतीने मिळणाऱ्या योजनांमुळे शेतकऱ्यांना शेतीला आधुनिकतेची जोड देता येणार आहे.
- बाळू पावडे, शेतकरी
महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून जवळपास १३ याेजनांसाठी एकाच सदराखाली आणल्या आहेत. यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान, अन्न सुरक्षा अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आदी योजनांचा समावेश करण्यात आला आहे.