नांदेड: अतिवृष्टीने जिल्ह्यात पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने विमा धारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्के अधिक रक्कम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही अधिकची नुकसान भरपाई विमा कंपनीला द्यावी लागनार आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाच्या अनियमितणामुळे सोयाबिन, कापूस, तुर व ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अशा वेळी विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी तात्काळ अधिसूचना काढण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा समितीमार्फत जिल्ह्यात सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. समितीने केलेल्या सर्वेक्षणात सर्व तालुक्यात पिकांच्या उत्पादकतेत ५० टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अहवाल समितीने दिला आहे.
या अहवालानुसार जिल्हाधिकारी राऊत यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२३-२४ अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसूचना लागू केली आहे. या अधिसूचनेनुसार सर्व तालुक्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना विहित मुदतीत नुकसान भरपाईची २५ टक्के आगाऊ रक्कम अदा करण्याचे निर्देश राऊत यांनी विमा कंपनीला दिले आहेत. या अधिसूचनेमुले शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या तुलनेत २५ टक्के अधिक रक्कम मिळणार आहे. या निर्णयाचे शेतकऱ्यांतून स्वागत केले जात आहे.