नांदेड : पावसाळ्याला प्रारंभ होऊन अनेक दिवस झाले तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांतील पाणीसाठा कमी झाला होता. तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण जलाशयाने आता तळ गाठल्याने केवळ १२ दलघमीच जिवंत पाणीसाठा राहिला होता. पण, मागील दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसाने प्रकल्पातील पाणीसाठा वाढला. विष्णुपुरी प्रकल्पात ५५ टक्के पाणीसाठा झाल्याने सध्यातरी शहरवासीयांचा पाणीप्रश्न सुटला आहे.
मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर झाला नव्हता, त्यामुळे शहराला आणखी किती दिवस पाणीपुरवठा नियमित करता येणार, याची चिंता मनपा प्रशासनालाही लागली होती. तर शहरातील काही भागात जून महिन्यातही टँकरनेच पाणीपुरवठा सुरू होता. त्यामुळे नांदेडकरांना टंचाईला सामोरे जावे लागले. नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्याने तळ गाठला होता. त्यामुळे जून महिन्यातही नांदेडकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. जिल्ह्यातील अनेक ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली. पण, मागील दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून, विहिरी, बोअरचे पाणीही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
प्रकल्पात होता १८ टक्केच पाणीसाठाशहराची तहान विष्णुपुरी प्रकल्प भागवतो. जून महिन्याच्या शेवटी तसेच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण जलाशयात १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे पाणीपुरवठ्याची सर्वांनाच चिंता लागली होती. पण, मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात तब्बल ३७ टक्क्यांची वाढ झालेली आहे.