नांदेड : मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे यांचे निधन झाले. वयाच्या 102 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळ आमदार खासदार राहिलेल्या धोंडगे यांनी आपली राजकीय कारकिर्दी गाजवली. त्यामुळेच, शेकापमध्ये असतानाही त्यांचा कामाचा आणि राजकीय उंचीचा राज्याच्या राजकारणात वेगळाच दबदबा होता.
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातून आलेल्या केशवराव धोंडगे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. ते सहा वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदीय कारकिर्दीमध्ये ५० वर्ष पूर्ण झाली म्हणून ठिकठिकाणी पवारांचे सत्कार झाले होते. अशाच एका सत्काराच्या कार्यक्रमात नांदेडमध्ये केशवराव धोंडगे यांनी पवारांचा स्टेजवरच मुका घेतला होता. त्यावेळी, अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण शरद पवारांचा भरस्टेजवर मुका घेण्याचं धाडस करणारा नेताही तेवढात ताकदीचा असणार हे महाराष्ट्राने पाहिलं. मात्र, त्याच स्टेजवर त्यांनी शरद पवारांवर टिकाही केली होती.
मुका घेतल्यानंतर लग्गेच धोंडगेंनी त्यांच्या भाषणात पवारांवर सडकून टीका केली होती. “शरद पवार हे बिना चीपड्याचे नारद आहेत. पवारांची बारामती म्हणजे भानामती आहे. पवार कोणाच्या घरचा माणूस कसा फोडतील याची कुणकुण लागू देत नाहीत. नारदही पवारांची बरोबरी करू शकत नाहीत”, अशा शब्दात त्याच स्टेजवर केशवरावांनी उपस्थितांना संबोधित केले होते. त्यामुळे, शरद पवारांचा मुका घेऊन त्यांच्यावर प्रेम करणारे आणि त्यांच्यावर सडकून टीका करणारे केशवराव धोंडगेंच्या राजकीय नेतृत्त्वाची उंची त्यावेळी महाराष्ट्राला दिसून आली.
राजकारणातील जातीचे राजकारण आणि वाढते गुन्हेगारीकरण लोकशाहीसाठी घातक आहे. हा प्रकार आम्ही पूर्वीही सहन केला नाही अन पुढेही सहन करणार नाही. माझं वय झालं असेल मी थकलो असेल पण माझे विचार थकणार नाहीत ना संपणार नाहीत. पूर्ण आयुष्य गोरगरीब, उपेक्षित, ‘नाहिरे’वाल्यासाठी काम केले. पुढेही करत राहणार असं, ते नेहेमीच म्हणत असत आणि त्याचा अवलंब करत असत. त्यामुळे, राजकीय नेत्यांमध्ये त्यांचा दबदबा होता.
शतकपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केला होता सन्मान
केशवराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांच्या संसदीय व सामाजिक कार्याचा गौरव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला होता. त्यावेळी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती करुन दिली होती. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तसेच, मराठवाडा विकासासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करणे, लोहा तालुक्यातील निर्मित्तीसाठी प्रयत्न केले. विशेष म्हणजे १०९० पासून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सत्राचा प्रारंभ वंदे मातरम या गाण्याने होत आहे, त्याची आग्रही मागणी केशवराव धोंडगे यांनी केली होती,