लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात २५ जानेवारी रोजी घडलेल्या रॅगिंग प्रकरणाची चौकशी अॅन्टीरॅगिंग समितीवर सोपवली आहे़ या समितीचा तपास गुलदस्त्यातच असून याप्रकरणी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़श्यामकुंवर यांनी देखील मौन बाळगले आहे़शहरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यासाठी मंगळवारी रात्री सिनिअर विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना वसतीगृहातील खोलीवर बोलावले़ यानंतर त्यांची रॅगिंग केली़ तसेच मारहाणदेखील केली़ याप्रकरणाची वजिराबाद पोलिसांनी नोंददेखील घेतली आहे़ दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बंद केले़ त्यानंतर सदर प्रकरण चौकशीसाठी अॅन्टीरँगिग समितीकडे देण्यात आले होते़ परंतु, गुरूवारी रात्री उशिरापर्यंत या समितीचा अहवाल प्राप्त झाला नव्हता़ त्यामुळे रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्यांना कधी न्याय मिळेल, असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे़ तर याप्रकरणी अधिष्ठाता डॉ़शामकुंवर यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी समितीच्या अहवालासंदर्भात बोलण्याचे टाळले़दरम्यान, सदर प्रकरणात एका राजकीय पक्षाच्या माध्यमातून मध्यस्थी करुन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा महाविद्यालयाच्या परिसरात आहे. मात्र या बाबत कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नसल्याचे गुरुवारी दिसून आले.अॅन्टीरॅगिंग समितीच्या अहवालाची आम्ही वाटत पाहत आहोत.सदर समितीचा अहवाल प्राप्त होताच या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नांदेडमधील आयुर्वेदिक महाविद्यालयातील अॅन्टीरॅगिंग समितीचा अहवाल गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:15 AM