नांदेड: परभणी दौऱ्यावर निघालेले सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण नांदेड जिल्हा हद्दीवर लिंबगावनजीक थांबले होते़ येथे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उकीरडे यांनी नियोजित रस्तेकामांची त्यांना माहिती दिली़ यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी परभणीहून येणाऱ्या रस्त्यासह वसमत-नांदेड रस्ता करायचा का, अशी शेतकऱ्यांना विचारणा केली़ शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदाने हो साहेब म्हणताच या दोन्ही रस्तेकामांना चव्हाण यांनी जागेवरच मंजुरी दिली़
शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण परभणी जिल्ह्यातील नियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते़ या निमित्ताने जिल्हा हद्दीवर लिंबगाव फाटा येथे बांधकाम विभागाच्यावतीने छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता़ येथे मुख्य अभियंता उकीरडे आणि अधीक्षक अभियंता धोंडगे यांनी चव्हाण यांना मराठवाड्यातील सुरु असलेल्या रस्तेकामांची सविस्तर माहिती दिली़ जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनीही त्यांचे लिंबगाव गटाच्या वतीने स्वागत करीत या भागातील रस्त्याची कामे तातडीने होणे गरजेचे असल्याचे सांगितले़
स्वागतानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही मराठवाड्यातील रस्तेकामाचा नकाशा दाखवून कोणत्या भागात कामाची गरज आहे़ याबाबतही अवगत केल़े परभणीकडून नांदेडकडे येणाऱ्या महामार्गाचे काम उरकत आले आहे़ मात्र, नांदेडकडून १३ कि. मी. चे काम अद्याप झालेले नाही़ सध्या या रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे़ लिंबगाव फाटा ते नांदेड शहरातील छत्रपती चौक अशा १३ कि. मी़ च्या कामाची गरज आहे़ याबरोबरच वसमत-आलेगाव ते निळा-नांदेड हा साधारण १७ ते १८ कि. मी़ चा रस्ताही नव्याने करण्याची आवश्यकता मुख्य अभियंता उकीरडे यांनी दिली़
यावेळी तेथे परिसरातील शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते़ उकीरडे यांच्या माहितीनंतर बांधकाममंत्री चव्हाण यांनी शेतकऱ्यांना हा रस्ता करायचा काय ? अशी विचारणा केली़ त्यावर एकाच आवाजात सर्व शेतकऱ्यांनी हो साहेब रस्त्याची गरज आहे़ या रस्ते कामांना मंजुरी द्या अशी आनंदाने हाक दिली़ त्यावर बांधकाममंत्री चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या दोन्ही रस्तेकामासाठी साधारण किती निधी लागेल? अशी विचारणा केली़ यावर लिंबगाव फाटा ते छत्रपती चौक या रस्त्यासाठी साधारण ४० कोटी तर आलेगाव-निळा-वसमत या १८ कि. मी़ च्या कामासाठी साधारण ५२ कोटींचा निधी अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले़ त्यानंतर बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी जागेवरच या दोन्ही रस्त्याच्या कामांना तात्काळ मंजुरी देत असल्याचे जाहीर केले़ बांधकाममंत्र्यांच्या या घोषणेचे उपस्थित शेतकऱ्यांनीही जयघोष करीत स्वागत केले़