- मारोती चिलपिपरेकंधार ( नांदेड) : माणसांप्रमाणेच प्रमाणेच प्राण्यांना देखील पुराचा फटका बसला असून तालुक्यातील बहाद्दरपुरा गावाजवळील मन्याड नदी पात्रात पाण्यात झाडावर दोन आठवड्यापासून अडकलेल्या २२ वानरांसाठी शुक्रवारी ( दि. १३ ) एसडीआरएफ जवानांच्या टीमकडून व वन विभागाकडून दिवसभर रेस्क्यू मोहीम राबवून त्यांच्या सुटकेसाठी दोरीच्या साह्याने शिडी तयार करून ठेवण्यात आली आहे.
मागील दोन आठवड्यापूर्वी राज्यभर सर्वत्र धो-धो पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसाचा कहर कंधार तालुक्यातही पहायला मिळाला. माणसांप्रमाणेच प्रमाणेच प्राण्यांना देखील पुराचा फटका बसला आहे. तालुक्यातील मन्याड नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीच्या पाण्यामध्ये २० ते २२ वानर अडकले होते. याची माहिती नागरिकांनी वन विभाग प्रशासनाला दिली. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी व जंगमवाडी गावातील सरपंच व काही नागरिक वानरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यापासून नदी पात्राचा किनारा ३०० मीटर अंतरावर असल्यामुळे वन विभागानी केलेल्या प्रयत्नाला यश प्राप्त होत नव्हते.भूकेलेल्या वानरांसाठी अन्नपदार्थ, केळी आणि फळांची व्यवस्था देखील या वन विभागाकडून रोज करण्यात येत होती.
दोरीची शिडी लावली अखेर धुळे येथून एसडीआरएफ जवानांच्या टीमला बोलवण्यात आले. शुक्रवारी ( दि. १३) या टीमने वन विभागाच्या मदतीने रेस्क्यू मोहीम सुरू केली. वानरांचा कळप अडकलेल्या झाडापासून नदीपात्राच्या किनाऱ्यापर्यंत दोरीची शिडी लावण्यात आली आहे. तसेच वानरांच्या हालचालीवर नजर ठेवण्याकरता कॅमेरे बसवण्यात आले होते. शुक्रवारी टोळीतील काही वानरे शिडीच्या साह्याने नदीपात्राच्या बाहेर आले असल्याची माहिती वन खात्याकडून मिळाली.
हे राबवत आहेत रेस्क्यू मोहीमकेशव वाबळे उपवनसंरक्षक, भिमसिंगजी ठाकूर सहाय्यक वनसंरक्षक नांदेड व सागर हराळ वनपरिक्षेत्र अधिकारी मुखेड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र मुखेड, वनपरिमंडळ कंधार, जंगमवाडी गावचे सरपंच व नागरिक आणि एसडीआरएफ जवानाच्या टिमसह अतिंद्र कट्टी मानद वन्यजीव रक्षक नांदेड, शंकर धोंडगे वनपरिमंडळ कंधार, शिवसांब घोडके वनरक्षक लिंबोटी, खय्यूम शेख वनरक्षक बामणी, नागरगोजे वनरक्षक आंबुलगा तसेच इतर वनकर्मचारी वानरांना अडकलेल्या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी मेहनत घेत आहेत.