नांदेड : बी.एस.एन.एल.ला ४-जी स्पेक्ट्रम वाटप करणे, १५ टक्के वाढीसह तिसऱ्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करणे, सेवानिवृत्त कर्मचा-यांना सुधारीत वेतनश्रेणी देणे, बी.एस.एन.एल.ला पूनर्जिवित करण्यासाठी प्रोत्साहन देणे आदी मागण्यांसाठी बी.एस.एन.एल.च्या आॅल युनियन अँड असोसिएशन कृती समितीच्या वतीने कर्मचारी आणि अधिका-यांनी संपाचे हत्यार उचलले असून ९० टक्के अधिकारी, कर्मचारी कामबंद संपात उतरले होते.१८ ते २० फेब्रुवारी या तीन दिवसांत बी.एस.एन.एल.च्या सर्व अधिकारी व कर्मचा?्यांच्या संघटनांनी देशव्यापी संप जाहीर केला होता़ नांदेड येथीलही अधिकारी, कर्मचारी संपात उतरले़ प्रारंभी पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली़ जम्मू-काश्मीरमधील स्फोटक परिस्थिती लक्षात घेऊन या संपामध्ये जम्मू-काश्मीरच्या बी.एस.एन.एल.च्या अधिकारी व कर्मचा-यांना संपातून वगळण्याचा निर्णय कृती समितीने घेतला असल्याचे देवीदास फुलारी यांनी सांगितले़ हुतात्मा झालेल्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर आॅल युनियन अँड असोसिएशनच्या वतीने आपली भूमिका मांडताना ए.डी. कुलकर्णी म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बी.एस.एन.एल.चे प्रचंड नुकसान झाले आहे. व्यवसायापेक्षा ग्राहकांना सेवा देणारी बी.एस.एन.एल. ही देशातील केवळ एकमात्र कंपनी आहे. पण सरकार प्रायव्हेट आॅपरेटरला प्राधान्य देऊन बी.एस.एन.एल.चे व कर्मचा-यांचे खच्चीकरण करण्याचे काम सध्याचे सरकार करीत आहे.यावेळी कृती समितीचे अध्यक्ष लालू कोंडलवाडे यांनी नांदेडच्या बी.एस.एन.एल. येथील अधिकारी आणि कर्मचा-यांनी मोठ्या प्रमाणावर संपाला प्रतिसाद दिल्याने सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त केली.यावेळी कृती समितीचे प्रामुख्याने तानाजी मळेवाले, शिवाजी झगडे, अशोक धुतराज, श्रीराम शिरसे, शिल्पा जावळे, श्याम जाधव, नर्मदाबाई कांबळे, बंडोपंत कुंटूरकर, आरती कुलकर्णी आणि राजेश्वर जोशीसह सर्व पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
बीएसएनएलच्या संपाला नांदेडमध्ये प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:34 AM