नाळेश्वर येथील चंद्रकांत पांडे यांचा मुलगा पवन यांचा विवाह कुंडलवाडी ता.बिलोली येथील ज्ञानेश्वर पांडे यांची कन्या शालिनी हिच्यासोबत जुळला होता. विवाहाची तारीख २२ एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली होती. विवाह पत्रिकाही छापण्यात आल्या. पत्रिकांचे वितरणही झाले. जवळपास दोन हजार पाहुणे विवाहाला येणार होते. त्यामुळे गोपाळचावडी (लिंबगाव) येथील मंगल कार्यालयाची नोंदणीही झाली होती. विवाह घटिका समीप आली. तोच शासनाने उपरोक्त प्रमाणे नियम जारी केल्याने वधू-वर पालकांच्या आनंदावर विरजन पडले. अशा स्थितीत विवाह सोहळा लांबणीवर टाकण्याशिवाय मार्ग नव्हता; मात्र दोन्ही कुटुंबांनी यातून मार्ग काढला. विवाह सोहळा साधेपणाने पार पाडण्याचा निश्चय केला.
शासनाने निर्धारित केलेल्या संख्येत म्हणजे २५ लोकांत विवाह करण्याचे व घराच्या अंगणात विवाह लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विवाह सोहळ्याला वऱ्हाळी आले केवळ आठ. दुसऱ्या बाजूने वऱ्हाडी ब्राह्मणांसह सतरा-अठरा जण आले आणि विवाह समारंभ सुरू झाला. गावातील हा सोहळा असूनही गावातील अनेकांना विवाहाला उपस्थित राहता येत नसल्याची खंत अनेकांना होती; मात्र मंगलाष्टका सुरू होताच गावकरी, महिला-पुरूष गच्चीवर, पत्र्यावर जमा झाले. तेथून त्यांनी अक्षता टाकल्या. कोरोनाच्या संकटात वधू-वरांच्या पालकांनी प्रथमच अशा आनंदात विवाह सोहळा संपन्न केला.
या विवाह सोहळ्याची पंचक्रोशीत चर्चा आहे. पैशाची उधळपट्टी, अन्नाची मोठी नासाडी शासनाच्या नव्या नियमामुळे किंबहुना कोरोनामुळे वाचली हे मात्र नक्की आहे.