नांदेड : येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्य पदाच्या निवडणुकीत रवींद्रसिंघ आशासिंघ बुंगई, मनप्रितसिंघ गोविंदसिंघ कुंजीवाले आणि गुरुमीतसिंघ लड्डुसिंघ महाजन हे तीन उमेदवार निवडून आले आहेत़ यात सर्वाधिक मते रवींद्रसिंघ बुंगई यांना मिळाले आहेत़
गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्य पदासाठी २८ डिसेंबर रोजी मतदान झाले़ ३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात उतरले होते़ ७१ मतदान केंद्रावर मतदान झाले़ या निवडणुकीची मतमोजणी २९ डिसेंबर रोजी करण्यात आली़ एकत्रित मतमोजणी ही सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली़ त्यात रवींद्रसिंघ बुंगई यांना सर्वाधिक ४ हजार ४७८ मते पडली़ तर दुसरे विजयी उमेदवार मनप्रितसिंघ कुंजीवाले यांना ४ हजार २४६ आणि गुरुमितसिंघ महाजन यांना ३ हजार ३७४ मते मिळाली़ हे तीन उमेदवार गुरुद्वारा बोर्डाच्या सदस्यपदी विजयी झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी केली.
या निवडणुकीत रणजीतसिंघ कामठेकर यांना २ हजार ९०९ मते तर तेजपालसिंघ खेड यांना २ हजार ६६४, ऋषिराजसिंघ ओबेराव यांना १ हजार ८३६, बलजीतसिंघ बावरी यांना १ हजार ८३ मते मिळाली़ निकालानंतर विजयी उमेदवारांची भव्य रॅली नांदेडमधून निघाली होती़
या निवडणुकीत नांदेडची मते निर्णायक ठरली़ विजयी उमेदवारातील रवींद्रसिंघ बुंगई यांना नांदेडमध्ये २ हजार ३९० मते मिळाली होती़ तर मनप्रितसिंघ कुंजीवाले यांना ३ हजार १० आणि गुरुमितसिंघ महाजन यांना १ हजार ९२४ मते मिळाली होती़ या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यासह औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बीड, लातूर या संपूर्ण जिल्ह्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना व जीवती या तालुक्यात मतदार होते