नांदेड : पैसे असो वा एखादी वस्तू हरवली असेल अन् ती कुणाला सापडली तर सहसा कुणी परत देण्यास तयार होत नाही. असे बऱ्याच वेळा आपण पाहतो. परंतु, सापडलेले पैसे कुणाचे आहेत. त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यास पैसे किंवा रक्कम परत देणारी माणसेही समाजात खूप कमी असतात. असाच प्रामाणिक प्रयत्न नांदेडातील एका प्राध्यापकाने केला आहे.११ फेब्रुवारी रोजी दुपारी वर्कशॉप येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेत पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी पी. एस. काळे पैसे काढण्यासाठी बँकेत आले. त्यांनी पंधरा हजार रुपये रोख रक्कम बँकेतून काढली. परंतु, खिशात टाकताना ती रक्कम खाली पडली. त्यानंतर ते बँकेतून निघून गेले़त्याचवेळी यशवंत महाविद्यालय येथील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक प्रा. गौतम दुथडे यांच्या नजरेस ही पडलेली रक्कम दिसली. त्यांनी रक्कम उचलत त्वरित शाखा अधिकारी यांना माहिती दिली़ शाखाधिका-यांनी कुणी रक्कम काढली याचा शोध घेण्यास सुरुवात केली़ बँकेतील सीसीटीव्ही कॅमेºयांचीही तपासणी करण्यात आली़ तोच काही वेळात सेवानिवृत्त कर्मचारी काळे यांना आपली रक्कम कुठेतरी पडल्याचे लक्षात आले. त्यामुळे ते परत बँकेत आले. प्रा.दुथडे यांनी ती रक्कम काळे यांना परत केली.प्रा. दुथडे यांचा प्रामाणिक प्रयत्न पाहून बँकेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला़ समाजात आजही प्रामाणिक माणसे शिल्लक असल्याचा यानिमित्ताने प्रत्यय आला.
सेवानिवृत्ताची बँकेत हरवलेली रक्कम प्राध्यापकाने केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:21 AM