जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला
नांदेड- जिल्ह्यात माळाकोळी आणि वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. मौजे आष्टूर येथे भास्कर मरिबा ससाणे यांनी दुचाकी (क्र. एम.एच.२६, एव्ही १२७७) उभी केली होती. ४० हजार रुपये किमतीची ही दुचाकी लंपास करण्यात आली, तर मारवाडी धर्मशाळेच्या पाठीमागे बाळासाहेब प्रभाकर टेकाळे यांनी उभी केलेली दुचाकी (क्र. एम.एच.२६, वाय १८२५) चोरीला गेली. या प्रकरणात माळाकोळी आणि वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
शेतातील आठ हजारांची मोटार लंपास
नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा शिवारात शेतकऱ्याची विद्युत मोटार लंपास करण्यात आली. संभाजी रामनाथ सुपारे यांच्या शेतातील ८ हजार रुपये किमतीची ही मोटार होती. ही घटना १४ मार्च रोजी घडली. या प्रकरणात सुपारे यांच्या तक्रारीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
एक लाख रुपयासाठी विवाहितेचा छळ
प्लॉट घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना बिलोली येथे घडली. पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याने सासरच्या मंडळींनी पीडितेला मारहाण केली. या प्रकरणात बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीच्या मागे जुगार अड्डा
देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे जुगार अड्डा भरविण्यात आला होता. पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. १६ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी सात हजार रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणात देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दोन ठिकाणी अवैध दारू पकडली
जिल्ह्यात इस्लापूर आणि उस्मानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी दारू पकडण्यात आली. किनवट तालुक्यातील मूळझरा येथे शेतातील धुऱ्यावर अवैध विक्रीसाठी ठेवण्यात आलेली चार हजार रुपयांची मोहफुलाची गावठी दारू ठेवण्यात आली होती. ही दारू पोलिसांनी जप्त केली, तर शिराढोण येथील महादेव मंदिराजवळ २ हजार रुपयांची देशी दारू बाळगून असलेला एक जण मिळून आला.