हदगाव ( नांदेड) : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हात मिळवणी केल्यानंतर शिवसेनेने जुने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रिय केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेकडून तीन वेळा आमदार व एक वेळा खासदार राहिलेले सुभाष वानखेडे यांची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत घर वापसी झाली. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वानखेडे यांनी पुन्हा शिवबंधन बांधले. यामुळे हदगाव येथे शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे.
शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जुन्या शिलेदारांना एकत्र करण्याचे सत्र सुरू केले आहे. खासदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात त्यांचे पडसाद उमटत आहेत. तर इकडे वानखेडे यांना मातोश्रीवरून बोलावण्यात आले. नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा घडवून आणली शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. सुभाष वानखेडे हे पुन्हा शिवसेनेत दाखल झाल्यामुळे नांदेड व हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेत होणारी मोठी होणारी फुट टाळता येईल अशी पक्षाला आशा आहे.
वानखेडे यांच्या पक्षप्रवेशामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये व नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्ययालयाचे दिसून येत आहे . यावेळी मातोश्रीवर नांदेड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव , जिल्ह्यातील पदाधिकारी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर , भुजंग पाटील , माधवराव पावडे , धोंडू पाटील , आष्टीकर भुजंग पाटील माधवराव पावडे , धोंडू पाटील , जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे , उमेश मुंडे , आनंदा बोंढारे सह अनेक शिवसेना पदाधिका - यांची उपस्थिती होती. त्यांच्या प्रवेशाचा हदगांव येथे शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्यामराव चव्हाण , युवासेनेचे कृष्णा पाटील आष्टीकर , युवा नेते भास्करदादा वानखेडे , हदगांव सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर जाधव पाटील , कडवट शिवसैनिक प्रकाशराव जाधव , दत्तरामजी जाधव , विद्यानंद जाधव , अवधूत देवसरकर , दिपक मुधोळकर आदींनी वानखेडे यांच्या निवासस्थानी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.
असा आहे वानखेडे यांचा राजकीय प्रवासमाजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या घरवापसीमुळे शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे . हिंगोली लोकसभेत पराभव झाल्यानंतर वानखेडे हे नाराज होऊन अगोदर भाजपमध्ये आणि नंतर हिंगोली लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी काँग्रेसमध्ये गेले होते. हदगाव विधानसभेच्या 1995, 1999 व 2004 अशा तिन्ही निवडणुकीत शिवसेनेकडून ते आमदार म्हणून निवडून आले होते. मराठवाड्याचे पक्षप्रतोद म्हणूनही त्यांच्यावर शिवसेनेने जबाबदारी टाकली होती. त्यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून ते निवडून आले. तर 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्याच काही पदाधिकारी व पुढाऱ्यांनी त्यांचा पराभव केल्यामुळे त्यांना विधानसभेला उमेदवारी देऊ नये असा त्यांचा आग्रह होता.
मात्र, वानखेडे यांची समजूत काढण्यासाठी त्यांना शिवसेनेने 2014 साली नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेची उमेदवारी बहाल केली होती. परंतु त्यांनी शिवसेनेचा बी फॉर्म परत देऊन ऐनवेळी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या विरोधात सेनेने तत्कालीन जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली. आपल्याला पराभूत करणाऱ्या वसमत आणि कळमनुरीच्या माजी आमदारांना उमेदवारी दिल्यामुळे माजी खासदार सुभाष वानखेडे नाराज होऊन त्यांनी भाजपची वाट धरली आणि सेनेच्या पुढाऱ्यावर कडव्या शब्दात टीका केली. त्यानंतर मधल्या काळात अनेकदा त्यांच्या घर वापसीचे प्रयत्न झाले . परंतु स्थानिक पुढाऱ्यांनी विरोध केल्यामुळे त्यात यश येऊ शकले नाही.
मुंबईतील अनेक वरिष्ठ नेत्यांशी वानखेडे यांचे सलोख्याचे संबंध होते . परंतु पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना नाराज करता येत नसल्याने वानखेडे यांच्यासाठी शिवसेनेत त्यावेळी अनुकूल वातावरण नव्हते . 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा उमेदवारी मिळेल अशी आशा काही पदाधिकाऱ्यांकडून वानखेडे यांना दिली. परंतु ऐनवेळी हेमंत पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे चिडलेल्या वानखेडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून हिंगोलीची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. भाजपा असो की काँग्रेस सुभाष वानखेडे यांचे पण कुठेही जमले नाही. केवळ कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याची औपचारिकता ते पार पाडत होते. त्यांचे मन शिवसेनेतच रमले होते . परंतु, काही जणांनी त्यांच्या परतीचे दोर कापल्यामुळे त्यांनीही शिवसेनेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी अधिक रस दाखला नव्हता.