नांदेड: लाचखोरीच्या घटनांमध्ये २०१६ च्या तुलनेत यंदा घट झाली असली तरी राज्यात महसूल विभाग लाचखोरीत अव्वल ठरला आहे़ त्या पाठोपाठ पोलीस दलाचा क्रमांक लागतो़ राज्यात गत अकरा महिन्यांत लाचखोरीची एकूण ७६२ प्रकरणे उघडकीस आली आहेत़
दरवर्षीप्रमाणे यंदा लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर आहे़ महसूलने राज्यात आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे़ त्या पाठोपाठ सर्वाधिक लाचखोरीचे प्रमाण हे पोलीस दलात आहे़ लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या व्यापक जनजागृतीमुळे लाचखोरीच्या प्रमाणात यंदा घट झाल्याचे पहावयास मिळते़ २०१६ मध्ये राज्यभरात लाचखोरीच्या ८६१ घटना उघडकीस आल्या होत्या़ त्यामध्ये १०९६ जणांना अटक करण्यात आली होती़ तर २०१७ मध्ये नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत लाचखोरीची ७६२ प्रकरणे उघडकीस आली असून त्यामध्ये १००८ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे़
यंदा महसूल विभागाने अव्वल क्रमांक पटकाविला असून या विभागात १८४ प्रकरणे उघडकीस आली़ त्यापाठोपाठ पोलिसांनी लाच स्वीकारल्याच्या १४८ घटना घडल्या आहेत़ त्यापाठोपाठ पंचायत समिती, महानगरपालिका, शिक्षण विभाग, वीज वितरण कंपनी, वन, जलसंपदा, आरोग्य, समाजकल्याण, सहकार व पणन या विभागांचा क्रमांक लागतो़ लाचखोरीत राज्यात नांदेड परिक्षेत्र हे सहाव्या क्रमांकावर आहे.
औरंगाबाद आणि नांदेड या परिक्षेत्रातील मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत लाचखोरीची १९६ प्रकरणे उघडकीस आली आहेत़ त्यात पुणे-१६१, औरंगाबाद-११३, नाशिक-१०९, नागपूर-९३, ठाणे-९२ व त्यानंतर नांदेड परिक्षेत्रातील ८३ प्रकरणे उघडकीस आली आहेत़ नांदेड परिक्षेत्रात अपसंपदेचे २ आणि अन्य भ्रष्टाचाराचे २ गुन्हेही यामध्ये समाविष्ट आहेत़ त्यातील ३२ प्रकरणांचा अद्यापही तपास सुरु असून ३६ प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत़ राज्यात महसूल विभाग लाचखोरीत आघाडीवर असताना नांदेड परिक्षेत्रात मात्र पोलीस दलातील सर्वाधिक १८ प्रकरणे उघडकीस आली आहेत़ त्यानंतर महसूल विभागाचा क्रमांक लागतो़
यंदा राज्यात जानेवारीत ६७, फेब्रुवारी-३८, मार्च-६७, एप्रिल-७४, मे-९०, जून-७६, जुलै-१०३, आॅगस्ट-६९, सप्टेंबर-७४, आॅक्टोबर-६७ तर नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत ३७ घटना उघडकीस आल्या आहेत़ हे प्रमाण गतवर्षीपेक्षा सध्यातरी ९९ ने कमी आहे़