उमरी (नांदेड ) : महसूल विभागातर्फे आज पहाटे वाळू माफियांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. बळेगाव येथे गोदावरी नदीपात्रातून गाढवांद्वारे जमा केलेली वाळू व अवैधरित्या वाळू वाहतूक करताना चार टिप्पर पकडण्यात आले.
परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार राजेश लांडगे , जी.एस. कोतलगावकर , मंडळ अधिकारी एस.बी.जाधव, एस. बी. बाचीपल्ले, तलाठी सोन्नर, हराळ, जाधव, कोतवाल दिलीप यमेवार , राठोड आदींचा या कारवाईत सहभाग होता.
बळेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी महसूल विभागाला प्राप्त झाल्या होत्या. यावरून आज पहाटे पाच वाजता पासून बळेगाव येथील गोदावरी नदीपात्राशेजारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली. अचानक धाडी टाकून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे चार टिप्पर पकडण्यात आले.
महसूल विभागाने पकडलेल्या टिपरचे क्रमांक एमएच- २६ - बीई , एमएच - २६ एडी- ३०५५ , एमएच - २० वाय - ८३४१, एमएच - १६ - जी - ६५७९ याप्रमाणे आहेत. सदर वाहनांना नियमानुसार दंड आकारण्यात येईल अशी माहिती तहसीलदार गायकवाड यांनी दिली.