शिवराज बिचेवार ।नांदेड : राज्यभर गाजलेल्या कृष्णूर येथील इंडिया मेगा अॅग्रो कंपनीतील धान्य घोटाळ्याची नांदेडसह हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांतही व्याप्ती पसरली आहे़ त्यात आता मुख्य सूत्रधार अटकेत असल्यामुळे तपासात धान्य घोटाळ्याची संपूर्ण साखळीच बाहेर येण्याची दाट शक्यता आहे़ त्यात घोटाळेबाजांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या अडचणीतही वाढ झाली आहे़१८ जुलै २०१८ रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी इंडिया मेगा अॅग्रो कंपनीवर धाड मारली होती़ त्यावेळी कंपनीत शासकीय धान्याचे दहा ट्रक आढळून आले होते़ पोलिसांनी या संपूर्ण कारवाईचे चित्रीकरण केले होते़ मीना यांनी या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे दिला होता़ त्यानंतर जप्त केलेले ट्रक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ठेवण्यात आले होते़ या जप्त मालाचा पंचनामा करण्यासाठी पोलिसांनी महसूल प्रशासनाला पत्र दिले होते़परंतु हे पत्र उशिरा मिळाल्यामुळे पंचनाम्यास विलंब झाला़ परिणामी जप्त केलेले धान्य खराब झाल्याचा दावा करण्यात आला़ धान्य खराब झाल्याचे खापरही पोलिसांवरच फोडण्यात आले़ तसेच कारवाईची पूर्वसूचना महसूल विभागाला दिली नसल्याचेही महसूल प्रशासनाचे म्हणणे होते़ त्यामुळे दोन विभागात चांगलीच जुंपली होती़ या प्रकरणात नुरुल हसन यांनी प्रत्येक बाबीचा बारकाईने तपास केला होता़न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते़ त्यामध्ये घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून यामध्ये महसूल प्रशासनातील अनेक जण असण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती़ पोलिसांच्या या अहवालामुळे महसूल प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला होता़ तहसीलदार संघटनेने आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता़ दोन विभागात जुंपली असताना नुरुल हसन हे मात्र घोटाळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रे गोळा करण्यात व्यस्त होते़ मेगा कंपनीतून जवळपास एक टेम्पोभर कागदपत्रे जप्त करण्यात आली होती़ तसेच मेगाच्या युनिटला सील ठोकण्यात आले होते़ परंतु यावेळी कंपनीने सर्वच युनिट पोलिसांनी बंद केल्याचा आरोप केला होता़ दरम्यान, वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार व संचालक जयप्रकाश तापडीया यांचा बिलोली न्यायालयाने दोन वेळेस जामीनअर्ज फेटाळला होता़ मध्यंतरी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांची बदली झाली़ त्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेवून सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडून तपास काढून तो गुप्तचर विभागाला देण्यात आला होता़ परंतु गुप्तचर विभागाकडून या तपासात कुठलीच प्रगती होत नसून आरोपी मोकाट असल्याबाबत न्यायालयाने कठोर शब्दात ताशेरे ओढले होते़ त्यानंतर आता या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक झाल्यामुळे त्यांना मदत करणारे प्रशासनातील अधिकारी आता रडारवर आले आहेत़वेषांतर करुन पोलिसांची टेहळणी
- धान्याचा काळा बाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी लगेच धाड मारण्याची घाई केली नाही़ पोलिसांनी या व्यवहाराचे सर्व पुरावे अगोदर गोळा केले़ १२ जुलैपासून कृष्णूरच्या मेगा कंपनीच्या बाहेर पोलीस कर्मचारी वेषांतर करुन टेहळणी करीत होते़ १२ जुलै रोजी शासकीय धान्याचे गोदामात ७ ट्रक आले होते़ त्यानंतर १६ जुलैला ६ ट्रक़ हे धान्य एफसीआयच्या गोदामातील असल्याची खात्री करण्यासाठी काही कर्मचारी एफसीआयच्या गोदामाबाहेर पहारा देत होते़ एफसीआयच्या गोदामातून धान्य घेवून ट्रक निघताच त्याचा पाठलाग करण्यास सुुरवात झाली़ या सर्व पाठलागाचे चित्रीकरण करण्यात आले़ हे सर्व ट्रक मेगा कंपनीत पोहोचताच पोलिसांनी धाड मारली़
- मेगा अॅग्रो कंपनीवर पोलिसांनी केलेली कारवाई संगनमताने केली असून संबंधित अधिकाºयाविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशा आशयाची मागणी मेगाने विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली होती़ तर भाजपाच्या शिष्टमंडळाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची भेट घेवून निवेदन दिले होते़
- पोलिसांच्या अहवालामुळे खळबळ उडाल्यानंतर महसूल प्रशासनाने १६ पानी अहवाल तयार केला होता़ तत्पूर्वी पोलिसांनी महसूलकडून तीन वर्षांचे रेकॉर्ड मागविले होते़
- महसूलच्या अहवालात धान्य चोरीला गेल्याची तक्रारच नसेल तर ? काळा बाजार झाला कसा ? तसेच बाहेर जिल्ह्यातील वाहनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत पोलिसांची कारवाईच नियमाला धरुन नसल्याचे म्हटले होते़
- पोलिसांनी आपल्या अहवालात सुरुवातीला गोदामात धान्याची सहा हजार पोती असल्याचा दावा केला होता़परंतु, तपासणीत गोदामात केवळ बाराशे पोती निघाली़