नांदेड : महापालिकेचा पुढील वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या असून नवनियुक्त आयुक्त सुशील खोडवेकर यांनी बुधवारी सर्व विभाग- प्रमुखांची बैठक घेऊन पुढील अर्थसंकल्पावर चर्चा केली. एप्रिल २0१५ ते मार्च २0१६ या वर्षातील अर्थसंकल्पाच्या तयारीला प्रशासनाकडून गती देण्यात येत आहे. मार्चअखेर हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात येईल. त्यापूर्वी स्थायी समिती सभेत प्रशासनाकडून हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवला जाईल. प्रशासकीय स्तरावरील अर्थसंकल्प तयार करताना त्यातील तरतुदी व निधीचा ताळमेळ घालण्यासाठी आयुक्तांकडून सूचना देण्यात आल्या. दरम्यान, महसुली उत्पन्न व खर्चाच्या नियोजनासोबत शहरातील मूलभूत सेवा सुविधा पुरविण्यासाठी निधीची तरतूद करत सन २0१४- १५ चा १ हजार ३ कोटी ४९ लाखांचा अर्थसंकल्प मनपा प्रशासनाने लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी स्थायी समितीसमोर सादर केला होता. मात्र या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळण्यापूर्वीच आचारसंहितेत अडकला होता. त्यामुळे प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अभ्यास करण्यास पदाधिकार्यांना मोठा कालावधी मिळाला होता. या वेळेत अर्थसंकल्पात नवीन विषय मांडण्यास संधी असल्याने तत्कालीन सभापती उमेश पवळे यांनी जागरूक नागरिक, अभ्यासक, पत्रकार यांच्याकडून सूचना मागविल्या होत्या. त्यास प्रतिसाद मिळाला होता. परंतु हा अर्थसंकल्प चार महिन्यानंतर मंजूर झाला होता. यंदा अर्थसंकल्प वेळेवर सादर करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. गतवर्षी उत्पन्न वाढीसाठी नवे पर्याय सुचवून खर्चात काटकसर करण्याचा तसेच कोणताही अतिरिक्त करवाढ प्रस्तावित नसलेला अर्थसंकल्प मनपा प्रशासनाने सादर केला होता.दरम्यान, दरवर्षी अर्थसंकल्प वेगवेगळ्या कारणामुळे लटकला जातो. यंदातरी, वेळेत बजेटला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. /(प्रतिनिधी)
मनपाच्या बजेटसाठी आढावा बैठक
By admin | Published: February 12, 2015 1:44 PM