तालुक्यात पंचायतराज समितीच्या सदस्यांनी मंडाळा, गोरठा व सिंधी येथे भेटी दिल्या. या गावातील ग्रामपंचायतीत पंचायत राज समितीने तेथील ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती घेतली. यासंदर्भाने उमरी पंचायत समितीमध्ये पंचायत राज समितीने बैठक घेऊन तालुक्यातील कामकाजाची माहिती घेतली. तालुक्यातील मंडाळा गावास भेट दिली असता, तेथे ग्रामसेवक उपस्थित नव्हते. याबद्दल पंचायत राज समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. मात्र, सदरील ग्रामसेवकांना मंडाळा गावासह सिंधी या गावाचा कार्यभार होता म्हणून त्यांना वरिष्ठांनी सिंधी याठिकाणी थांबण्यास सांगितले होते. ही बाब स्पष्ट झाल्यावर पंचायत राज समितीचे पदाधिकारी शांत झाले. उमरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या सर्व कामकाजाबद्दल पंचायत राज समितीने समाधान व्यक्त केले. या निमित्ताने तालुक्यातील शिक्षण, आरोग्य, बांधकाम तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्व जय्यत तयारी केली होती. पंचायत समितीमध्ये झालेल्या बैठकीस पंचायत राज समितीच्या पदाधिकाऱ्यांसह जि. प. च्या सीईओ वर्षा ठाकूर जि. प. सदस्य ललिताताई यलमगोंडे, संगीता जाधव, पंचायत समितीच्या सभापती सावित्राबाई सोनकांबळे, उपसभापती शिरीषराव देशमुख गोरठेकर, पंचायत समिती सदस्य पल्लवी मुंगल, चक्रधर गुंडेवार, प्रभारी गटविकास अधिकारी नारवाटकर आदींसह सर्व विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती. या दौऱ्याआधी गेल्या काही दिवसांपासून उमरी तालुक्यातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली होती. मात्र, संपूर्ण दौरा समाधानकारक झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
उमरी तालुक्यातील पंचायत राज समितीच्या दौऱ्यात तालुक्यातील कामकाजाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:22 AM