धर्माबाद (नांदेड ) : तेलंगणा राज्यातील रेशन दुकानातील तांदूळ धर्माबादच्या काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने बोलेरो व्हॅनमधून आणताना तेलंगणा पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी सीमेलगत बिद्राळी चेक पोस्टजवळ छापा टाकून २२ क्विंटल तांदूळ गाडीसह ताब्यात घेतला. गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याची माहिती बासर पोलीस ठाण्याचे एसआईटी महेश यांनी दिली.
निजामाबादहून धर्माबादकडे तेलंगणा राज्यातील सुमारे २२ क्विंटल तांदूळ बोलेरो व्हन (क्रमांक टी़एस़ १६ यु़बी़५५३७) या वाहनातून धर्माबादच्या काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने नेत असल्याची माहिती मिळताच बासर पोलीस ठाण्याचे एसआईटी महेश यांच्या पथकाने धर्माबाद सीमावर्ती भागावर लागून असलेल्या बासर रोडवरील बिद्राळी चेक पोस्ट येथे शुक्रवारी धर्माबाद येथील चालक मोहमद आरीफसह वाहन ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला़ या पथकात पोलीस कॉन्स्टेबल नरसय्या, प्रवीण रेड्डी, लक्ष्मण रेड्डी आदींचा समावेश होता.
तेलंगणा राज्यातील रेशनचा तांदूळ मोठ्या प्रमाणात धर्माबादमार्गे महाराष्ट्रातील विविध भागात व धर्माबाद शहरात आयात होत असून दररोज चारशे ते पाचशे क्विंटलची सर्रास चोरट्या मार्गाने काळ्या बाजारात विक्री होत आहे. ही विक्री करणारी धर्माबाद शहरात मोठी टोळी असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळते. तेलंगणातील रेशनच्या तांदळाला पॉलीश मारून बनावट तांदूळ करून चढ्या भावाने विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
निजामाबाद, बोधन, कंदाकुर्ती, साठापूर, म्हैसा, निर्मल, कामारेड्डी, तानूर, आदिलाबाद या भागांतून रेशनचा तांदूळ मोठ्या प्रमाणात आयात होत असल्याचे सूत्रांनी सांगितले़. तेलगंणात व महाराष्ट्रात रेशनचा तांदूळ सर्रास विक्री करणारी मोठी टोळी आहे. धर्माबाद येथील काही भुसार दुकानात विक्री केली जात असून तेथून इतर राज्यांतही विक्री होत आहे.