नांदेड : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा पोलिसांनी ५५ दिवसांनंतर छडा लावला आहे. दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याच्या साथीदारांनी खंडणी वसुली आणि दहशत निर्माण करण्यासाठी बियाणी यांची गोळ्या घालून हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत आणखी आरोपी अटक करण्यात येतील, अशी माहिती विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी दिली.
५ एप्रिल रोजी सकाळच्या वेळी संजय बियाणी यांची घरासमोरच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली. या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी पोलिसांवर सर्वच बाजूंनी प्रचंड दबाव होता. पोलिसांनी तपासासाठी एसआयटीची स्थापना केली होती. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीचे प्रमुख अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासह २० अधिकारी आणि ६० पोलीस अंमलदार या तपासात ५५ दिवस अनेक राज्यांत फिरले. बियाणी यांची हत्या खंडणी वसुली आणि दहशत निर्माण करण्यासाठीच करण्यात आली, या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले होते.
या प्रकरणात कट रचणाऱ्या सनी उर्फ तिरथसिंघ मेजर (३५), मुक्तेश्वर उर्फ गोलू विजय मंगनाळे (२५), सतनामसिंघ उर्फ दलबिरसिंघ शेरगील (२८), हरदीपसिंघ उर्फ सोनू पिनीपाना बाजवा (३५), गुरमुखसिंघ सेवकसिंघ गील (२४) आणि करणजितसिंघ रघुबीरसिंघ साहू (३०) या नांदेडच्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली. बियाणी यांच्यावर गोळीबार करणारे मात्र परराज्यातील असून, ते सध्या फरार आहेत. अटकेतील सहा आरोपींना प्रथमवर्ग न्या. बी. एम. देशमुख यांच्यासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ती पिस्टल बाहेर देशातील... बियाणी यांची हत्या ज्या नऊ एमएम या पिस्टलने करण्यात आली. ती पिस्टल बाहेर देशातून आणण्यात आली होती. दहशतवादी रिंदा यानेच ती पिस्टल पाठविली होती. पाकिस्तानमध्ये बसून रिंदा हा सूत्रे हलवित आहे. बियाणी यांची हत्या केल्यानंतर दहशत पसरेल आणि खंडणी उकळणे सोपे होईल, असा त्याचा उद्देश होता.
चार देशात केला पत्रव्यवहार पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी चार देशांमध्ये पत्रव्यवहार केला होता, तर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात तपासासाठी पथके गेली होती.