गेल्या मार्चमध्ये कोरोनामुळे जमीनदोस्त असलेला पोल्ट्री व्यवसाय मागील चार महिन्यांत बऱ्यापैकी सावरला होता. कोरोनामुळे बहुतांश जणांनी आरोग्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळेच कोंबड्यांसह अंड्यांची मागणी वाढली होती. पक्षी आणि अंड्यांना चांगला दर मिळत असल्याने कोरोना काळात झालेले नुकसान भरून निघत असतानाच, आता बर्ड फ्लूने संकट उभे केले आहे. ग्राहक अपप्रचाराला बळी पडले, तर कष्टाने सावरलेला हा व्यवसाय पुन्हा एकदा मोडून पडेल, या भीतीने पोल्ट्रीधारक हबकले आहेत. कोणताही फ्लू आला तर त्याचा पहिला बळी पोल्ट्री व्यवसायच ठरतो, असे समीकरणच गेल्या काही वर्षांपासून तयार झाले आहे. मार्चमध्ये आलेल्या कोरोनावेळीदेखील चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, असा अपप्रचार झाला आणि पोल्ट्री व्यावसायिकांना जिवंत कोंबड्या गाडून टाकाव्या लागल्या, मोफत वाटाव्या लागल्या. त्यामुळे पोल्ट्री व्यावायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तर अनेकांचे व्यवसाय बसले. नांदेड जिल्ह्यात दोन हजाराहून अधिक पोल्ट्री व्यावसायिक होते. परंतु, कोरोना काळात अनेकांनी व्यवसाय बंद केले असून आजघडील केवळ ६०० च्या आसपासच व्यावसायिकांकडे पक्षी विक्रीसाठी तयार आहेत.
अद्याप तरी बर्ड फ्लू नाही
बर्ड फ्लू आल्याचे समजताच पोल्ट्री व्यावसायिकांनी पक्ष्यांना लसीकरण सुरू केले आहे. त्यात लिव्हरसाठी असणा-या टॉनिकच्या लससह फ्लू रोखण्यासाठी आवश्यक असणा-या लस दिल्या जात आहेत. त्यात शेड रिकामा करून दिले जाणारे आणि शेडमध्ये पक्षी असताना देण्यात येणारे, असे दोन्ही प्रकारचे लसीकरण करण्यात येत असल्याचे पोल्ट्री व्यावायिक अतुल पेद्देवाड यांनी सांगितले. तसेच पक्षी विक्रीसाठी बाहेर काढल्यानंतर ते पुन्हा शेडमध्ये सोडले जात नाहीत. शेडमध्ये असणा-या व्यक्ती अथवा पक्ष्यांच्या बाहेरील व्यक्तीशी संबंध येऊ दिला जात नाही.
अंडी घेऊन पक्षी तयार करणे, छोट्या पक्ष्यांपासून मोठे म्हणजेच ९० ते १३० दिवसांपर्यंत त्यांचा सांभाळ करून ते पक्षी विक्री करण्याचे काम व्यावसायिक करत आहेत. परंतु, कोरोनापासूनच योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याने नांदेड जिल्ह्यात अद्यापर्यंत तरी बर्ड फ्लूचा प्रसार झालेला नाही.