नांदेड - गेल्या काही महिन्यात नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्यातच लसीकरणाला सुरुवात झाल्यामुळे नांदेडकरांनी सुटकेचा श्वास सोडला होता. परंतु, आता राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर झालेल्या बैठकीत नांदेडबाबतही चर्चा करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण हे पन्नासहून कमीच आढळून येत आहेत. त्याचबराेबर मृत्यूदरही कमी झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २२ हजार ८०० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ५९० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे नांदेडकरांची बेफिकीरी वाढल्याचे दिसून येत आहे. अनेकजण विनामास्क फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर या बाबींकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. वरिष्ठ स्तरावर झालेल्या बैठकीत ज्या जिल्ह्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली, त्यात नांदेडचाही समावेश आहे. त्यामुळे नांदेडकरांनी अधिक खबरदारी बाळगण्याची गरज आहे.
सावधान कोरोनाचा धोका वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:16 AM