बीएसएनएलच्या १६ बॅटऱ्या लंपास
नायगांव तालुक्यातील कृष्णूर येथे असलेल्या बीएसएनएल कार्यालयातील ७५ हजार रुपये किमतीच्या सोळा बॅटऱ्या लंपास करण्यात आल्या. चोरट्याने कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. ही घटना २०ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अर्सजन येथे दुचाकी लांबविली
नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अर्सजन येथून मजूर असलेल्या राहुल पुंडलिक रगडे यांची दुचाकी चोरट्याने लांबविली. ही घटना २८ ऑगस्ट रोजी घडली. रगडे यांनी मारुती मंदिरासमोर ही दुचाकी उभी केली होती. या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाडी
शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिलगेट ते एनटीसी रोड परिसर आणि हिंगोली गेटसमोर दोन ठिकाणी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाडी मारल्या. यावेळी तीन हजार रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद झाला.
सराफा मार्केटमध्ये अवैध दारू पकडली
नायगांव शहरातील सराफा मार्केट भागात महादेव मंदिराजवळ अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेली दारू पोलिसांनी पकडली. साडे चार हजार रुपयांच्या दारूसह दुचाकीही जप्त करण्यात आली. या प्रकरणात नायगांव ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तर वजिराबाद हद्दीत नल्ला गुट्टा चाळ येथे दोन हजारांची दारू पकडली.
बसमध्ये चढताना मोबाईल लांबविला
नायगाव शहरातील बसस्थानकात बसमध्ये चढताना एकाचा ३५ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्याने लांबविला. ही घटना ३० ऑगस्ट रोजी घडली. आनंदराव पंढरीनाथ कुरे हे ३० ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता बसमध्ये चढत होते. या प्रकरणात नायगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
गुत्तेदाराचे साहित्य नेले उचलून
मौजे उस्माननगर ते शिराढोण रस्त्यावर एका घरासमोर ठेवण्यात आलेले गुत्तेदाराचे दीड लाख रुपये किमतीचे सेंट्रींगचे साहित्य लंपास करण्यात आले. ही घटना २९ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात अजमदखान अहमदखान पठाण यांच्या तक्रारीवरून उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.