कुटुंब शाल अंगठीत व्यस्त अन् चोरटे घरात
नांदेड- नायगाव शहरात एक कुटुंब मुलाच्या शाल अंगठीच्या कार्यक्रमात व्यस्त असताना चोरट्याने संधी साधत घरातील चार लाख रुपयाचा ऐवज लंपास केला. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी घडली.
जोगेंद्रसिंह नंदूसिंह ठाकूर रा. इरिगेशन कॅम्प या तरुणाचा २८ फेब्रुवारी रोजी शाल अंगठीचा कार्यक्रम होता. त्यासाठी सर्व कुटुंब इरिगेशन कॅम्प भागातील विश्रामगृहात गेले होते. इकडे कार्यक्रम सुरू असताना चोरट्यांनी संधी साधत स्वयंपाकघराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी सोन्याचे दागिने आणि रोख दोन लाख रुपये असा एकूण चार लाख रुपयाचा ऐवज लंपास केला. तर चोरीची दुसरी घटना लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळणी येथे घडली. तळणी शिवारातील अर्जुनराव सूर्यवंशी यांच्या शेतात असलेली वीज कंपनीची डीपी फोडून त्यातील ६० हजार रुपये किमतीची तांब्याची तार लंपास करण्यात आली. या प्रकरणात सहायक अभियंता उत्तम सूर्यतळ यांच्या तक्रारीवरून लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रवासात ॲपलचा मोबाईल चोरीला
नांदेड- नांदेड ते बारड प्रवासात एका व्यापाऱ्याचा ३९ हजार रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला. ही घटना १ मार्च रोजी घडली. या प्रकरणात बारड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आमेद अब्दुल बावजीर हे व्यापारी आपल्या भावासह नांदेडहून कुशन घेऊन बारडला जात होते. प्रवासात त्यांच्या खिशातील ३९ हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविण्यात आला. थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली.