नांदेड : शेतातील आखाड्यावर जेवण करीत असताना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ७ ते ८ दरोडेखोरांनी तलवारीचा धाक दाखवून ८० हजार रुपये पळविल्याची घटना ७ ऑगस्ट रोजी आंबेगाव शिवारात घडली आहे.
जिल्ह्यात चोरी आणि दरोड्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव शिवारात गोविंद मुसळे यांचा शेत आखाडा आहे. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुदखेड तालुक्यातील नागेली येथील गजानन पंडितराव गव्हाणे आणि त्यांचे मित्र आंबेगाव शिवारातील या आखाड्यावर जेवण करीत थांबले होते. यावेळी ७ ते ८ आरोपी आखाड्यावर दाखल झाले.
आरोपींनी गजानन गव्हाणे यांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या खिशामधील नगदी ६० हजार रुपये, गोविंद मुसळे यांच्या खिशातील ७५००, दीपक सीपरकर यांच्या खिशातील ६२५० रुपये, रवी गव्हाणे यांच्या खिशातील ३४२० आणि सुनील मुसळे यांच्या खिशातील २८६० असे ८० हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच आरोपींनी थापड धुक्याने मारहाण केली. या घटनेनंतर गजानन गव्हाणे यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. त्यावरून दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.