मुखेड (जि. नांदेड) : तालुक्यातील बावनवाडी येथे वीटभट्टी चालक के. नरसिमलु बालोजी हे दिनांक ४ रोजी कामगारांना मजुरीची आगाऊ रक्कम देण्यास आले होते. रक्कम वाटप करून जाताना गावाबाहेर काही युवकांनी त्यांची कार अडवून चाकू दाखवून त्यांच्याजवळील १ लाख चाळीस हजार रुपये लुटले.
याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या दरोड्यातील पाचही आरोपींना पोलिसांनी अवघ्या पाच तासात अटक केली आहे. तालुक्यातील बावनवाडी येथील अनेक बेरोजगार युवक व नागरिक विकाराबाद तेलंगणा येथे वीटभट्टीवर कामास जातात. या लोकांना उचल रक्कम देण्यासाठी रविवारी के. नरसिमलु के. बालोजी (रा.घाणापूर,मंडळ कुलकचरेला जि. विकाराबाद) हे गावात आले असता लोकांना रक्कम देऊन परत विकाराबादकडे जात असताना आरोपी अण्णा ( अनिल) वाघमारे, परसराम वाघमारे, बालाजी वाघमारे, शिवप्रसाद गोटमुकले यांनी सायंकाळी पाच वाजता कार अडवून ही लूट केली.
एक आरोपी अल्पवयीनपाच जणांपैकी एक आरोपी हा अल्पवयीन असून त्याचे वय १६ वर्षे इतके आहे. सध्या अल्पवयीन आणि तरुण आरोपींची संख्या गुन्हेगारीत वाढत असल्याने चिंतेचा विषय ठरला आहे.
डोळ्यांमध्ये फेकली मिरचीची पूडकार रोखताच मिरचीची भुकटी डोळ्यात टाकून के. नरसिमलु के. बालोजी यांच्या जवळील १ लाख ४० हजार रुपये घेऊन गेले. याप्रकरणी दिनांक ५ रोजी पहाटे २.३० वाजता मुखेड पोलीस ठाण्यात वरील आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरा आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे हे करीत आहे.