महिलेचा मोबाईल लंपास
नांदेड- वसंतनगर येथील घरासमोर उभे राहून पतीशी फोनवर बोलत असलेल्या कांचन राहुल देशमुख यांचा मोबाईल दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी हिसकावून पळविला. २२ हजार ९९० रुपये मोबाईलची किंमत होती. कांचन देशमुख यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुुुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोत एक हजार जणांचे लसीकरण
नांदेड- सिडको येथील मातृसेवा रुग्णालयात एक हजार नागरिकांचे पहिल्या टप्प्यांचे लसीकरण पूर्ण झाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली जिल्हेवार यांच्यासह केंद्रातील कर्मचारी सुरेश आरगुलवार, संदीप तुपेकर, आकाश शिंगे, विवेकानंद लोखंडे तसेच परिचारिका जयश्री दरेगावे, मिनाक्षी शिंगे, वैशाली वाघमारे, नसरीन पिंजारी आदींनी यासाठी पुढाकार घेतला.
घरावर दगडफेक करुन मारहाण
नांदेड- मागील वादाच्या कारणावरुन एका घरावर दगडफेक करुन दीर-भावजयीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना १७ एप्रिल रोजी सकाळी मुखेड तालुक्यातील दबडे शिरुर येथे घडली. दबडे शिरुर येथील नितीन कुंडगीर, हनमंत कुंडगीर, प्रदीप कुंडगीर, बंडू कुंडगीर, सुधीर कुंडगीर, सुलोचना कुंडगीर, केवळाबाई कुंडगीर यांनी संगनमत करुन सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास व्यंकट दबडे यांच्या घरासमोर येऊन जुन्या वादाच्या कारणावरुन त्यांच्या घरावर दगडफेक करुन व्यंकट दबडे यांना दगड मारुन डोके फोडले. त्यानंतर व्यंकट यांची भावजयी सुनीता दबडे यांना नितीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दरवाजा तोडला. या प्रकरणी व्यंकट दबडे यांच्या फिर्यादीवरुन मुखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गावठी दारु जप्त
नांदेड- विनापरवाना स्वताच्या घरात दारु बाळगणाऱ्या किनवट पोलिसांनी ताब्यात घेतले. तालुक्यातील मदनापूर येथे १८ एप्रिल रोजी सायंकाळी केलेल्या या कारवाईत १ हजार ४०० रुपये किमतीची गावठी दारु जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मोटारसायकलची चोरी
नांदेड- एका इसमाची मोटारसायकल चोरुन नेल्याची घटना १६ एप्रिल रोजी रात्री हदगाव शहरात घडली. शिवाजीनगर येथील सुरेश कदम यांनी त्यांची मोटारसायकल घरासमोर उभी करुन ठेवली होती. ती चोरट्यांनी रात्री चोरुन नेली. या प्रकरणी हदगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तरुणावर जीवघेणा हल्ला
नांदेड- कोरोना बाधित रुग्ण असतानाही गावात का फिरतो असे म्हणून आरोपीने एका तरुणास जबर मारहाण केल्याची घटना १७ एप्रिल रोजी मुखेड तालुक्यातील दबडे शिरुर येथे घडली. दत्ता दबडे, व्यंकट दबडे, बाबूराव दबडे, पिंटू दबडे, संदीप दबडे, महानंदा दबडे व सुनंदा दबडे यांनी तरुणास कत्ती, काठीने व दगडाने मारुन जखमी केले.