नांदेड विभागातून देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत. अनलाॅक प्रक्रियेमध्ये तब्बल ७८ गाड्या सुरू करण्यात आल्या असून यातील साठहून अधिक गाड्यांना विशेष गाड्या म्हणून चालविण्यात येत आहे. रेग्युलर धावणाऱ्या रेल्वेपेक्षा या गाड्यांना अधिक असणाऱ्या तिकिटाचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
तिकिटात दुप्पटच फरक
कोरोनाकाळात रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या; परंतु कालांतराने विशेष गाड्या सुरू होत आहेत.
रेग्युलर धावणाऱ्या रेल्वे आणि उत्सव विशेष व विशेष गाड्यांच्या तिकिटात दुपटीचा फरक येत आहे.
प्रवाशांकडून विशेष रेल्वेच्या नावावर सुरू असलेली लूट तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे अरुण मेघराज यांनी केली.
लॉकडाऊनपासून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष रेल्वे सुरू केल्या. त्यात आता वाढ झाली असून नांदेडातून ७८ गाड्या धावत आहेत.
यातील बहुतांश गाड्यांना तिकिटासाठी किमान १०० आणि कमाल ३०० चा फाॅर्म्युला वापरला जात आहे. त्यामुळे २० किमीसाठी १०० रुपयांचे तिकीट लागते.
कोरोनामुळे विविध नियम घालून दिले आहेत. त्यात रुग्णसंख्या घटूनही नियम शिथिल करण्यात आले नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच सर्वच रेल्वे गाड्या सुरू करून पूर्वीप्रमाणेच तिकीट आकारावे. कोरोनाच्या नावाखाली प्रवाशांची लूट असून ती थांबविण्यासाठी शासनाने आदेश द्यावेत. - गणेश पाटील
विशेष रेल्वेच्या नावाखाली केवळ पैसे उकळण्याचे काम रेल्वे प्रशासन करीत आहे. आजघडीला सर्वकाही सुरळीत सुरू असताना रेल्वेच का सुरू नाहीत. सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवावर रेल्वेची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे रेल्वेने अशाप्रकारे प्रवाशांची होणारी लूट थांबवून सर्व गाड्या सुरू कराव्यात. - सोनू कांबळे
ही लूट कधी बंद होणार?
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून रेल्वेसेवा बंद होती; परंतु, परराज्यातील मजुरांना सोडण्यासाठी मजूर रेल्वे सोडण्यात आल्या. त्यानंतर विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या. आजघडीला कोणतेही सण उत्सव नसताना विशेष रेल्वे का चालविल्या जात आहेत. सर्व रेल्वे नियमितपणे सुरू होऊन प्रवाशांची होणारी आर्थिक लूट कधी थांबणार आहे, असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत.
आपल्या जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वे
०४६९२ अमृतसर - नांदेड
०४६९१ नांदेड - अमृतसर
०२४४० श्री गंगासागर- नांदेड
०२४३९ नांदेड - श्री गंगासागर
०७६१४ नांदेड - पनवेल
०७६१३ पनवेल - नांदेड
०२२७२ मुंबई - जालना