शहीद दिलीपसिंग पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक नागनाथ केंद्रे व मिलिंद लोखंडे हे दोघे जण १० मे, २०२१ रोजी पेट्रोल पंपावरील ८ लाख ४३ हजार रुपये घेऊन बँकेत भरण्यासाठी जात होते. पेट्रोल पंपापासूनच दुचाकीवरून काही जण त्यांचा पाठलाग करीत होते. वडेपुरी गावाजवळ आरोपींनी केंद्रे यांनी दुचाकी अडविली. त्यांच्या आणि लोखंडे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून खाली पाडले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणात सोनखेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला. स्थागुशाचे पोनि.द्वारकादास चिखलीकर यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरातील शिवनगर व गोविंदनगर भागातून राजू सत्यम जाधव आणि त्याच्या आत्याचा मुलगा नागेश पोचीराम गायकवाड या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविला. त्यामध्ये पोपटासारखी त्यांनी उत्तरे दिली. त्यानंतर, पोलिसांनी अमोल बाजीराव जाधव रा.मुगट, जितेश बाबुराव ढगे, रामा व्यंकटी पवार रा.देगाव, गणेश कोत्तावार रा.होटाळा, ता.नायगांव, गणपत देवकर रा.घुंगराळा, ता.नायगांव यांची नावे सांगितली. पोलिसांनी लगेच सर्वांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ५० हजार ७०० रुपये रोख, सात मोबाइल असा २ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला, तर दोन आरोपी मात्र फरार आहेत. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. पांडुरंग भारती, पोउपनि आशिष बोराटे, सचिन सोनवणे, दत्ता काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कट रचणारे दोघे फरार
लक्ष्मण बालाजी मोरे रा.मुदखेड आणि आकाश पंढरीनाथ पवळे रा.जानापुरी या दोघांनी मिळून लुटीचा कट रचला होता. या दोघांनी दोन दिवस पेट्रोल पंपावर पाळत ठेवली होती. आकाश पवळे याला मॅनेजर किती रक्कम घेऊन जातो, याची माहिती होती. त्यानंतर, इतर आरोपीच्या मदतीने लूट करण्यात आली. लुटीनंतर मुगट जवळ एका गायरान शेतात सर्वांनी लुटीची रक्कम वाटून घेतली.