नांदेड : मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध प्रश्नांवर आंदोलन, मोर्चे करताना सर्वात समोर असणाऱ्या महिलांना मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समितीमध्ये स्थान दिले नाही़ त्यामुळे या स्वयंघोषित समन्वयकांची भूमिका संशयास्पद वाटत असून समितीमध्ये पन्नास टक्के महिलांचा सहभाग करून घेण्यासाठी राज्यभर संघटन उभे करणार असल्याची माहिती पुणे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष तथा महिला समन्वयक समितीच्या उषा पाटील इंगोले पत्रपरिषदेत दिली़
मराठा समाजाच्या हक्कासाठी आजपर्यंत ५८ मूकमोर्चे काढले़ त्यानंतर काही स्वयंघोषित समन्वयकांनी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने उभी करून समाजाची दिशाभूल करण्याचे काम केल्याचा आरोप इंगोले यांनी केला़ दरम्यान, वेगवेगळ्या प्रकारच्या समन्वय समित्या स्थापन करून त्यांनी राज्य शासनाशी वेळोवेळी बैठका, चर्चा केल्या़ परंतु, आजपर्यंत समाजाच्या २२ मागण्यांपैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही़ मग समन्वयक शासनाकडे कोणत्या विषयाची चर्चा करीत आहेत, असा प्रन त्यांनी उपस्थित केला़ दरम्यान, पुणे येथे राज्यस्तरीय बैठक घेवून पुन्हा १७५ जणांची राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली़ परंतु, त्यात एकाही महिलेला स्थान दिले नाही़ सर्व आंदोलनात महिलांना पुढे करण्यात आले तर मग आज राज्यस्तरीय समन्वय समितीत महिलांना का डावलले? असा प्रश्न इंगोले यांनी उपस्थित केला़ काही समन्वयकांच्या दुकानदाऱ्या सुरू असून ते उजेडात येतील म्हणून महिलांना दूर ठेवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला़
दरम्यान, मराठा महिला क्रांती मोर्चाची स्थापना करून त्यामध्ये समाजासाठी धडपडणाऱ्या महिलांचे संघटन उभे करणार असल्याचे उषा पाटील यांनी सांगितले़ यापुढे शासनासोबत कोणत्याही समन्वयकांना चर्चा करायची असेल तर त्यांना महिलांना सोबत घ्यावेच लागेल, अन्यथा आम्ही चर्चा होवू देणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला़ जलसमाधी, ठोकमोर्चा अथवा उग्र आंदोलनाची भूमिका घेणाऱ्यांचे जीव जात नाहीत, समन्वयक का आत्महत्या करीत नाहीत़ अशा लोकांच्या आवाहानास प्रतिसाद देवून काही समाजबांधव भावनिक होवून जीव देतात़ हे थांबायला हवे़ जीव दिल्याने प्रश्न सुटणार नसून समाजाच्या मागण्यांचा कृती आराखडा तयार करून त्याची पद्धतशीर मांडणी करणे, कायद्याच्या चौकटीत मागण्या बसविणे हाच पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले़ येणाऱ्या काळात समाजातील तज्ज्ञ, अभ्यासू मंडळींना सोबत घेवून मागण्यासंदर्भात लढा देणार असल्याचे इंगोले पाटील यांनी सांगितले़ यावेळी पत्रकार परिषदेला विद्या पाटील, रेवती पाटील, कदम यांची उपस्थिती होती़
वेळप्रसंगी पदाचा राजीनामाही देवूमाझ्यासाठी समाज मोठा आहे़ मी पदासाठी काम करीत नाही़ काही महिलांना मी जिजाऊ ब्रिगेडची जिल्हाध्यक्ष असल्याने समितीबाबत काही महिलांनी शंका निर्माण केली़ परंतु, वेळप्रसंगी मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामाही देईल़; पण ५० टक्के महिलांना राज्यस्तरीय समितीत सहभागी करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे उषा इंगोले पाटील यांनी स्पष्ट केले़ तसेच या महिलांच्या समितीत सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, वकील, उद्योग आदी क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना सहभागी करून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़