नांदेड : सध्याच्या काळात बहुतांश कामे हे यंत्रावरच केली जात आहेत; परंतु अशाही परिस्थितीत काही कामांसाठी शेतमजूर आवश्यकच असतो. शेतमजुरीतही वाढ करण्यात आली आहे; परंतु असे असतानाही मजूर मिळणे अवघड झाले आहे. त्यातून एकमेकांच्या शेतावरील मजूर पळविण्याच्या घटना घडत आहेत.
शेतात काम करण्यास आज अनेक जण नाक मुरडत आहेत. सध्या महिला मजुरांना दिवसाकाठी १५० रुपये तर पुरुष मजुरांना ३०० रुपये दिले जातात; परंतु अशाप्रकारे दिवसावर काम करण्यापेक्षा अनेक मजूर हे कामाचे गुत्ते घेतात. उदा. एक एकरमधील सोयाबीन काढावयाचे असल्यास साधारणता हजार रुपये पाच महिला घेतात. हे काम ते एक दिवसातच पूर्ण करतात. त्यातून प्रत्येक महिलेला किमान दोनशे रुपये मिळतात.
अशाच प्रकारे पुरुषही गट करून गुत्ते घेतात. त्यातून मजुरीच्या रूपात जास्तीचा पैसा त्यांना मिळतो; परंतु असे असतानाही शेतमजूर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतमालक या मजुरांची मर्जी राखण्याचा प्रयत्न करतो. संकटाच्या काळात त्यांना मदतीचा हातही देतो.