'कीव्हमध्ये पोहचलो अन् विमानतळावर हल्ला झाला', २०० विद्यार्थ्यांनी ३ दिवस काढले बस प्रवासात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 07:03 PM2022-02-25T19:03:25+5:302022-02-25T19:07:54+5:30
Russia Ukrain war: युद्ध परिस्थिती उद्भवल्यानंतर चर्नीव्हीस्ट येथून २ बसमध्ये जवळपास २०० विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीवसाठी परवा सायंकाळी निघाले.
- शिवराज बिचेवार
नांदेड: कीव या युक्रेनच्या राजधानीत बसमधून २०० विद्यार्थी पोहोचताच विमानतळवर रशियाने हल्ला केल्याने या विद्यार्थ्यांना मायदेशी परतता आले नाही. यामुळे युक्रेनमधून (Russia Ukrain war) भारतात परतण्यासाठी निघालेल्या जवळपास २०० विद्यार्थ्यांना ४८ तासांपेक्ष जास्त वेळ बसमध्येच प्रवास करावा लागला. या विद्यार्थ्यांमध्ये नांदेडच्याही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (200 students had to travel by bus for three days, but could not return home in India)
नांदेड येथील संजीवनी वनाळेकर ही मुलगी युक्रेन मधील चर्नीव्हिस्ट मधील बुकोविनियन स्टेट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस चे शिक्षण घेत आहे. युद्ध परिस्थिती उद्भवल्यानंतर चर्नीव्हीस्ट येथून २ बसमध्ये जवळपास २०० विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीवसाठी परवा सायंकाळी निघाले. किव विमानतळावरून या विद्यार्थ्यांचे विमान होते. विद्यार्थ्यांच्या बस किवमध्ये पोहोचल्या देखील. पण कीव विमानतळाच्या धावपट्टीवर रशियाने मिसाईल हल्ला केल्याने विमानतळ बंद झाले.
कीवमध्ये गंभीर परिस्थिती असल्याने हे सर्व विद्यार्थी पुन्हा बसने चर्नीव्हिस्टसाठी निघाले. पण कीव शहर सोडणाऱ्या नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याने या विद्यार्थ्यांना अडकून पडावे लागले. परत चर्नीव्हिस्टला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना जवळपास ४८ तास लागले. भारतीय वेळेनुसार पाऊनेपाच वाजेच्या सुमारास हे विद्यार्थी पोहोचले. या विद्यार्थ्यांना आता चर्नीव्हिस्ट वरून रोमानिया या देशात नेले जाणार आहे. त्यानंतर तेथून भारतात आणले जाणार आहे.
२ दिवसांपासून आपली मुलगी बस मध्ये अडकून पडल्याने संजीवनीचे आई वडील चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणावे अशी मागणी संजीवनीच्या पालकांनी शासनाकडे केली आहे.