नांदेड: सचिन वाझे प्रकरणात राज्य सरकारकडून तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. राज्यातील पोलीस यंत्रणा सक्षम आणि विश्वासार्ह आहे; परंतु असे असतानाही या प्रकरणाचा तपास केंद्राने एनआयएला दिला. अशाप्रकारे राज्याच्या कारभारात केंद्राचा हस्तक्षेप अकारण सुरू असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. (Sachin Vaze case : Central interference in state affairs said Ashok chavan)
ते म्हणाले, राज्याच्या पोलीस यंत्रणेत अनेक चांगले अधिकारी आहेत. ते अनेक किचकट प्रकरणांचा चांगला तपास करीत आहेत; परंतु त्यानंतरही केंद्राने या प्रकरणात हस्तक्षेप केला. राज्य शासन कुणालाही पाठीशी घालत नाही; परंतु केंद्राला पोलीस यंत्रणेवर विश्वास नसावा असेच वाटते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चव्हाण म्हणाले, सोमवारी सुनावणीचा पहिला दिवस होता. आता मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्यांना दोन दिवसांची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर राज्य शासनाला आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल. ॲटर्नी जनरलना नोटीस दिली आहे. त्यांनी म्हणणे मांडल्यानंतर केंद्राची मराठा आरक्षणाबाबत नेमकी काय भूमिका आहे, हे स्पष्ट होईल असे चव्हाण यांनी सांगितले.