नांदेड :रेल्वेच्यानांदेड विभागात रेल्वे मार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी ७ जून रोजी लाईन ब्लॉक घेतला असून, सचखंड, नगरसोल, काचीगुडा यासह इतर अनेक गाड्या बुधवारी विलंबाने धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
पूर्णा ते चुडावा या दरम्यान रेल्वे मार्गाची कामे ७ जून रोजी केली जाणार आहेत. त्यासाठी लाईन ब्लॉक घेतला असून, अमृतसर- नांदेड (१२७१६) सचखंड एक्स्प्रेस पूर्णा ते नांदेड दरम्यान ४० मिनिटे, काचीगुडा-नगरसलो एक्स्प्रेस (१७६६१) नांदेड ते चुडावा दरम्यान ६५ मिनटे, नगरसोल- काचीगुडा एक्स्प्रेस (१७६६२) परभणी ते पूर्णा दरम्यान २ तास, नरखेड- काचीगुडा (१७६४२) पूर्णा ते येथे ५० मिनिटे थांबेल आणि काचीगुडा- नरखेड (१७६४१) नांदेड ते चुडावा दरम्यान अर्धा तास उशिराने धावणार आहे.
निझामाबाद पॅसेंजर रद्दहैदराबाद विभागातही रेल्वेची कामे सुरु आहेत. त्याचा परिणाम मराठवाड्यातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांवर होणार आहे. नांदेड ते निझामबाद पॅसेंजर (०७८५४) ही रेल्वे गाडी ७ ते १३ जूनपर्यंत रद्द केली आहे. तसेच निझामबाद- पूर्णा (०७८५३) ही पॅसेंजर रेल्वे ८ ते १४ जून दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसेच दौंड ते निझामाबाद एक्स्प्रेस (११४०९) ७ ते १३ जून दरम्यान मुदखेड ते निझामाबाद दरम्यान अंशत: रद्द केली आहे. निझामाबाद ते पंढरपूर (०१४१३) ही रेल्वे गाडी ८ ते १४ जून या काळात निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.