गुरुवारी लाेकमत प्रतिनिधीने नांदेडमधील नवीन माेंढा येथे प्रत्यक्ष भेट देऊन साेयाबीनच्या लिलाव व मिळणाऱ्या भावाची पाहणी केली. तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी ‘लाेकमत’कडे आपली व्यथा मांडली. १५ दिवसांपूर्वी सोयाबीनला ८ हजार १०० ते ८ हजार ५०० रुपये भाव होता. २३ सप्टेंबर रोजी नवामोंढा बाजारात ३५० क्विंटल आवक झाली. पावसामुळे दोन दिवसांपासून आवक कमी होती. गुरुवारी मात्र शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नवामोंढ्यात गर्दी केली होती. सध्या माेंढ्यामध्ये २५० ते ३०० क्विंटल साेयाबीनची दरदिवशी आवक हाेत आहे. ओला असूनही शेतकरी साेयाबीन विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. यावरून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येताे.
शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे?
सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने सोयाबीनची लागवड केली होती. शेतकऱ्यांकडे माल नव्हता तेव्हा भाव चांगला होता. आता शेतकऱ्यांकडे माल येताच, बाजारात भाव कमी झाले आहेत. शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे?
-विश्वनाथ कदम, पिंपरी महिपाल, ता. नांदेड
आता शासनानेच विचार करावा
सोयाबीनच्या पिकासाठी एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च करावा लागला. निसर्गाच्या तावडीतून वाचलेल्या शेतमालाला आता ५ हजार रुपये भाव मिळत आहे. एकरामागे चार ते पाच क्विंटल उतारा येत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या पदरात काय पडत आहे, याचा विचार शासनाने करावा.
-संभाजी कदम, पिंपरी महिपाल, ता. नांदेड
व्यापारी म्हणतात, मिलमधून मागणी नाही
सध्या ओला माल विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे मालाला भाव कमी मिळत आहे. सध्या शासनाने १२ हजार टन डीओसी मागविलेली आहे. मिलवाल्याजवळ डीओसीला डीमांड नसल्याने बाजार कमी केला आहे. आम्ही फक्त ५० पैसे शेकडा कमिशनचे हक्कदार आहोत.
-रामनिवास द्वारकादास मोरक्या, व्यापारी, नवामोंढा, नांदेड
आवक वाढल्यास भावही वाढतील
नवामाेंढा बाजारात सध्या २५० ते ३०० क्विंटल सोयाबीनची आवक आहे. खरा माल बाजारात आल्यास भाव वाढतील. पंधरा दिवसांनंतर भाव वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी ३ हजार ४०० ते ३ हजार ५०० रुपये भाव होता. त्यानंतर भाव वाढले होते.
-संतोष मुळे, व्यापारी, नवामोंढा, नांदेड
चौकट....
आमचे काेणी ऐकतच नाही
सोयाबीनचे तेल दीडशे रुपये किलाेने विक्री होत आहे अन् शेतकऱ्यांचे सोयाबीन मात्र ४ ते ५ हजार रुपयांत विकत घेत आहेत. १३ हजार रुपयांना सोयाबीनची बॅग विकत घेतली. आता भिजलेला माल विक्री करण्यास आणला म्हणजे काही तरी अडचण आहे; पण आमची भावनाच कोणी ऐकण्यास तयार नसल्याची खंत लक्ष्मण कतुरे, कामाजी मोकाटे, रहाटी, रंगनाथ कदम या शेतकऱ्यांनी बाेलून दाखविली.