याबाबत थोडक्यात वृत्त अशी की, सैनिकाची रणरागिनी कन्या दीपमाला व संतोष दिकोंडावार या दोघांचा विवाह २००२ मध्ये झाला, टेलरिंगच्या व्यवसायात दोघेही स्पेशालिस्ट होते,तीन मुले असून दहावी,आठवी,व पाचव्या वर्गात शिक्षण घेत आहेत, पाच वर्षापूर्वी पती संतोष यास कावीळ झाल्याचे समजल्याने दीपमालाचे चंदीगड येथे वडील सैन्यात असल्याने येथील हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता त्यांची एक किडनी लहान व मोठी किडनी निकामी झाल्याचे समजले. तेव्हापासून या रणरागिनीने एकटीचा टेलरिंगच्या मजुरीवर तीन मुलांचे शिक्षण, संसाराचा खर्च, लाईट बिल, घर किराया, पतीच्या औषधांचा खर्च, महिन्यातून एक वेळा तरी रक्त चढविणे असा खर्च चालवीत जीव मेटाकुटीला आला होता.
अशा कठीण संकटातून संसार चालवीत असताना कोरोना काळात धर्माबाद ते नांदेड शंभर किलोमीटरचे अंतर डायलेसिस करण्यासाठी बाहेर निघणे शक्य नसल्याने दहावीच्या मुलांला मोटारसायकल शिकवून दोनशे किलोमीटर येणे जाणे करून थकून जात असे. काम बंद झाल्याने, टेलरिंगचा व्यवसायही बंद झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ लागली. ही व्यथा पत्रकारांना सांगितली. त्यांनी मीडिया व व्हाॅट्स ॲप, फेसबुक माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्याने सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन मालू यांनी घरी येऊन विचारपूस करून मदतीचे आश्वासन दिले.
गोवर्धन मालू यांनी साई प्रसाद सेवा परिवाराकडे दीपमालाची कहाणी सांगितली असता उपचारासाठी आतापर्यंत ३७ हजार रुपयांची मदत केली असून टेलरिंग व्यवसायासाठी मदत करण्याचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने कुटुंबाला आधार मिळाला. दीपमाला व संतोष दिकोंडवार यांनी आभार मानले.
धर्माबाद येथील दानशूर लोकांच्याकडून महिन्यातून दोन वेळा रक्तपुरवठासाठी लागणारी रक्कम देण्यासाठी काही लोकांकडे शब्द टाकला असता अनेक लोकांनी सहकार्य करण्याची हमी दिली. हे सुरुवात प्रथम गोवर्धन मालू यांनी स्वतःचे पैसे देऊन सुरुवात केली, मार्केट कमिटीचे उपसभापती रामचंद्र पाटील बंन्नाळीकर, पत्रकार जी.पी.मिसाळे यांनीही एक रक्त पिशवी देऊन सहकार्य केले आहे.
सैनिकांच्या कुटुंबावर आलेले संकट दूर करण्यासाठी देशभक्तीची नीती असणाऱ्यांनी या कुटुंबाला आधार देत असल्याबद्दल त्यांनी या दानशूरांचे आभार मानले. विस्कटलेल्या संसाराची घडी बसण्यासाठी समाजबांधवांनी, दानशूर लोकांनी सहकार्य करावे अशी विनंती सैनिक कन्या दीपमाला संतोष दिकोंडावार यांनी केली आहे.