सलग तीन दिवस सुटी असल्याने सोमवारी होणार गर्दी
उमरी : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू झाली असून आज उमेदवारी भरण्याच्या दुसऱ्या दिवशी दिवसभरात ३३६ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. मात्र, दिवसभरात एकही अर्ज दाखल झालेला नाही.
उमरी तालुक्यात करकाळा गाव वगळता एकूण ५७ ग्रामपंचायतींच्या ४४५ जागांसाठी निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने उमरीच्या तहसील कार्यालयात जय्यत तयारी करण्यात आली.
बुधवारी सकाळपासूनच तहसील कार्यालयाच्या आवारात अर्ज स्वीकारण्यासाठी पंधरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कक्ष सुरू झाले. बुधवारी व गुरुवारी असे दोन दिवस ३३६ एवढ्या उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती लिपिक दिपक शेटे यांनी दिली. उमेदवारी अर्जांची मोठ्या प्रमाणात विक्री झालेली असली तरी प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज मात्र एकही दाखल झालेला नाही, हे विशेष होय. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी उमरी तहसील कार्यालयात शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले. यामध्ये विविध खात्यांच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यात विस्ताराधिकारी, शाखा अभियंता, शाळांचे केंद्रप्रमुख आदींची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याठिकाणी ३० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. उमरी तालुक्यात एकूण १७५ मतदान केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर चार याप्रमाणे मतदान केंद्र अधिकारी व त्यांचे कनिष्ठ कर्मचारी राहतील. या वेळेच्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी जनतेमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. आता प्रत्यक्षात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंचाची निवड करण्यात येणार आहे. हे स्पष्ट झालेले आहे. विशेष म्हणजे सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाले असल्यामुळे आता कुणीही सरपंचपदाचा दावेदार म्हणून पुढे येणार नाही. म्हणून सरपंच पदाचा लिलाव यासारख्या गैरप्रकारांना चाप बसला आहे. पर्यायाने संभाव्य सरपंच पदासाठी दावेदार असणाऱ्याला संपूर्ण पॅनलच्या निवडणूक प्रचाराचा खर्च आदी कुठलीही जबाबदारी असणार नाही. त्यामुळे सर्वजण अत्यंत खुल्या वातावरणात या निवडणुकीला सामोरे जात आहेत.