विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड :वर्षभरापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या माध्यमातून राजकारणात उतरलेल्या संभाजी ब्रिगेडने पुन्हा सामाजिक चळवळीवर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने ब्रिगेडच्या नेतृत्वातही बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रविवारी (२५ मार्च) पुणे येथे बैठक होत असून या बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली.मेळाव्यानिमित्ताने नांदेड येथे आल्यानंतर गायकवाड यांनी ‘लोकमत’शी खास संवाद साधला. काही वर्षांपूर्वी मराठा सेवा संघाने राजकारणात उतरत शिवराज्य पक्षाची स्थापना केली. ब्रिगेडिअर सुधीर सावंत बरेच वर्षे अध्यक्ष होते, परंतु तो प्रयोग यशस्वी झाला नाही. शालीनीताई पाटील यांनीही छावा संघटनेला सोबत घेऊन क्रांतीसेना काढली. मराठा महासंघही काही काळासाठी राजकारणात उतरला. मात्र त्यांच्याही हाती काही लागले नव्हते. त्यामुळेच एका जातीच्या संघटनेचे पक्षात रुपांतर करु नये, अशी माझी भूमिका होती. या भूमिकेतूनच संभाजी ब्रिगेडने राजकारणात उतरु नये, असे माझे म्हणणे होते. मात्र त्यानंतरही काही जणांनी राजकीय पक्ष काढण्याची भूमिका रेटून नेली. पर्यायाने मी राजीनामा देवून संभाजी ब्रिगेडपासून अलिप्त झालो. राजकारणाच्या बाबतीत मला शेकापची भूमिका महत्त्वाची वाटते. शेकापचा आणि आमचा फुले-शाहू-आंबेडकर, सत्यशोधक चळवळ हा वारसा आणि विचारही एकच असल्याचे लक्षात आले. विखुरलेले असले तरी शेकापचे राज्यात ५ आमदार, दोनशेवर लोकप्रतिनिधी आहेत. चार-पाच बैठकांनंतर शेकापला सोबत घेऊन पुढे जाण्याचा विचार झाला. या बैठकांना जयंत पाटील यांच्यासह पुरुषोत्तम खेडेकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र खेडेकर यांनी अचानक नोव्हेंबरमध्ये संभाजी ब्रिगेड राजकारणात उतरत असल्याची घोषणा केली.खेडेकर यांची ही भूमिका ९९ टक्के पदाधिकाºयांना मान्य नव्हती. मात्र पक्षाची घोषणा करीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारही उभे करण्यात आले. मतदारांनी ब्रिगेडच्या उमेदवारांना प्रतिसाद दिला नाही. यातून पदाधिकारी-कार्यकर्त्यांत नैराश्य आले. राज्यभरातील ब्रिगेडच्या या कार्यकर्त्यांनी राजकारण नको, सामाजिक कामच करु, अशी भूमिका घेतली असून याबाबत पुण्यामध्ये २५ मार्च रोजी धोरणात्मक निर्णय घेण्याचे निश्चित केले असल्याचे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.मी सध्या शेकापमध्ये आहे. पुढील काळातही शेकापमध्येच राहणार असल्याचे सांगत नुकत्याच झालेल्या विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेतही मी सहभाग घेत भूमिका मांडली. मात्र मी बोलायला लागलो की, कार्यकर्ते जवळ यायचे ते संभाजी ब्रिगेडचेच. माझ्यामुळे ब्रिगेडसारख्या सामाजिक संघटनेला धोका नको म्हणून तेथूनही मी बाजूला गेलो. मात्र सामाजिक प्रबोधनासाठी संभाजी ब्रिगेड आवश्यक असल्याने येणाºया काळात केडरबेस काम करीत ब्रिगेडच्या माध्यमातून राज्यात सामाजिक संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.राजकीय पक्षाचे पर्याय ठेवणार खुलेसामाजिक चळवळीतल्या तरुणांनी राजकारणात आले पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचे प्रवीण गायकवाड यांनी स्पष्ट केले. राज्यकर्ते वाईट, भ्रष्टाचारी असा समज सामाजिक कार्यकर्त्यांत करुन देण्यात आला असून तो धोकादायक असल्याचे सांगत संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटन म्हणून मजबूत करतानाच संघटनेतील कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पर्याय खुले ठेवणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षपदासाठी दोघा-तिघांची नावे समोर आहेत. मात्र राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मी नेतृत्व स्वीकारावे, असा आग्रह असल्याचे सांगत गायकवाड यांनी एकप्रकारे ब्रिगेडचे नेतृत्व पुन्हा खांद्यावर घेणार असल्याचे संकेत दिले.भूमिका बदलत राहणे खेडेकरांचे धोरणसंभाजी ब्रिगेडचे राज्यभरातील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. ही अस्वस्थता संघटनेचे नेते पुरुषोत्तम खेडेकर समजून घ्यायला तयार नसल्याची टीकाही गायकवाड यांनी केली. खेडेकर हे मोठ्या उंचीवर जावून बसले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद उरला नाही. संघटनेतील प्रश्न बसून मिटविले पाहिजेत. मात्र खेडेकर यांचा तो स्वभाव नाही आणि हातोटीही. नवीन कार्यकर्ते येतात-जातात. संघटनेत ही प्रक्रिया कायमस्वरुपी असते असे त्यांचे धोरण असल्याचे सांगत खेडेकर यांना स्टॅटेजी म्हणून सेना-भाजपच सत्तेत रहावी, असे वाटते. कारण नॉन मराठा पक्ष सत्तेत राहिल्यास संघटनेच्या मराठा नेत्यांना महत्त्व येते, असे खेडेकर यांचे सरळ राजकारण असल्याची टीका प्रवीण गायकवाड यांनी केली.
संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात बदल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 1:19 AM