सुनील चौरे।लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : तामसा येथील अंगणवाडीची नियोजित जागा वार्ड क्ऱ ४ मध्ये असताना बांधकाम मात्र चक्क विठ्ठल मंदिरात वार्ड क्ऱ ३ मध्ये झाले. मुळ जागेत अंगणवाडीऐवजी ग्रामपंचायतचा वॉटर प्लांट सुरु आहे़ अंगणवाडी मात्र जिल्हा परिषद शाळेमध्ये भरविली जाते़, असे चित्र आहे.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व पायाभूत विकास निधी सन २०१०-११ अंतर्गंत तामसा येथील वार्ड क्रमांक ४ मध्ये अंगणवाडी मंजूर झाली. नियमानुसार याच प्रभागात अंगणवाडीचे काम होणे आवश्यक होते, मात्र ग्रामपंचायतने जागा नसल्याचे कारण दर्शवून वार्ड क्रमांक ३ मध्ये असलेल्या विठ्ठल मंदिर परिसरात अंगणवाडी बांधली. याच अंगणवाडीत इतर तीन अंगणवाडी भरविल्या जातात. मंदीर गावात आहे. नवीन बसस्थानक, जुने बसस्थानक हा परिसरा दिवसभर वर्दळीचा असतो. त्यामुळे अंगणवाडीत मुलांना पाठविण्यास पालक धजावत नाहीत. मदतनीसानाही अंगणवाडीत मुलांना घेवून जाणे अवघड आहे. त्यामुळे अंगणवाडी जि.प.शाळेतच भरविली जाते. याऊलट विठ्ठल मंदिरामध्ये जुना वाडा आहे. पडकी विहिरही आहे, यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो. याशिवाय याच इमारतीमध्ये ग्रामपंचायतीचा वॉटर प्लांट आहे. पाच रुपयांना एक बॉटल , या दराने पाण्याची विक्री केली जाते. एकीकडे सध्याची अंगणवाडी पडक्या जि.प.शाळेत भरते, आणि अंगणवाडीच्या जागेत इमारत बांधून तिचा उपयोग मात्र होत नाही. यामागे कोण मास्टरमार्इंड आहे? ग्रामपंचायतचा खरा उद्देश काय आहे? असे नानाविध प्रश्न विचारले जात आहेत.यासंदर्भात पंचायत समिती सदस्य शंकर मेंढके यांनी जुलै महिन्यात तक्रार केली होती़ सभापती सुनिता दवणे यांनीही भेट देवून पाहणी केली़ चौकशी गुलदस्त्यातच आहे़ यावर प्रकल्प अधिकारी यांनीही लक्ष दिले नाही किंवा बीडीओंनीही कानाडोळा का केला? असा सवाल करुन वरिष्ठांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी मेंढके यांनी केली़
अडचण काही नाही, दोन अंगणवाडी तिथे भरतात, एक शाळेत भरते. विरोधक ओरड करीत असतात- भारतीबाई बास्टेवाड, सरपंच, तामसा ग्रामपंचायत