लोकमत न्यूज नेटवर्क बिलोली (जि. नांदेड) : सुविधा मिळत नसल्याने नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवरील गावांतील नागरिकांनी तेलंगणात जाण्याची मागणी केली असून, त्याचाच एक भाग म्हणून बिलोली तालुक्यात संवाद यात्रेचे नियोजन सुरू झाले आहे. या यात्रेची तारीख निश्चित झाली नसली, तरी ही चळवळ वाढणार असल्याचे परिस्थितीवरून दिसत आहे.
नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील गावांमधून तेलंगणात समावेश करण्याची मागणी होत आहे. या अनुषंगाने कृती समितीची स्थापन करण्यात आली आहे. देगलूर, बिलोली मतदारसंघातील तेलंगणा सीमेवर असलेल्या गावांचा स्वातंत्र्यानंतरही विकास झाला नाही. तेलंगणातील शेती, रस्ते, शासनाच्या योजना, मोफत वीज, पाण्याची सुविधा पाहता, धर्माबाद तालुक्यातील २२ गावांच्या सरपंचांनी २०१८-१९ मध्ये मोठे आंदोलनही केले होते. मात्र, त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे तेलंगणात समावेशाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला जात आहे. यासाठी लवकरच संवाद यात्रा काढली जाणार असून, त्यानंतर चळवळ अधिक आक्रमक केली जाईल, असे येसगी येथील माजी सरपंच गंगाधर प्रचंड यांनी सांगितले.