नांदेड - लोहा तालुक्यातील बेनाळ येथे अवैध वाळू वाहतूकीवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी लोहा पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोहा तालुक्यातील बेनाळ येथे वाळूची अवैध वाहतूक सुरु असल्याची माहिती महसुलाच्या पथकाला मिळाली. कारवाईसाठी महसूलचे एक पथक गुरुवारी मध्यरात्री येथे पोहोंचले. पथक आल्याचे लक्षात येताच वाळू माफियांनी पथकाच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. यात पथकाच्या गाडीच्या काचा फुटल्या असून त्यातील कर्मचारी थोडक्यात बचावले आहेत. यानंतर वाळू माफियांनी येथून पलायन केले.
दरम्यान, नांदेड शहरातील कोउठा भागात गोदावरी नदीच्या पात्रातून मोठया प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत होता. महसूल च्या पथकाने कारवाई करीत वाळू माफियांचे तराफे जाळले होते. त्यावेळी वाळू माफियांनी महसूल च्या वाहनावर दगडफेक केली होती. तसेच तलाठ्यांना धक्का बुक्की केली होती. त्यानंतर लोहा तालुक्यात ही दुसरी घटना घडली आहे.