नांदेड - आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करत व्यावसायिक संजय बियाणी यांची (Sanjay Biyani Murder Case) अंत्ययात्रा संतप्त कोलंबी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर थांबवली. जोपर्यंत मुख्यसूत्रधार आणि आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्ययात्रा पुढे नेणार नाहीत अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची मंगळवारी त्यांच्या घरासमोर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामुळे कोलंबी येथील ग्रामस्थ आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत. आज सकाळी बियाणी यांचे पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी बियाणी यांचे नातेवाईक, ग्रामस्थ आणि नागरिकांनी पोलिस प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला.
दरम्यान, दुपारी बियाणी यांची अंत्ययात्रा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आल्यानंतर पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत आरोपींना आणि त्यामागील मुख्य सूत्रधारकास अटक होत नाही तोपर्यंत अंत्ययात्रा पुढे नेणार नाही असा पवित्रा संतप्त जमावाने घेतला होता. अखेर अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी आश्वासन दिल्यानंतर अंत्ययात्रा पुढे गेली.