नांदेड- व्यावसायिक संजय बियाणी यांची भर दिवसा झालेली हत्येची घटना (Sanjay Biyani Murder Case) ही मराठवाड्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच मी तातडीने नांदेडला आलो. ज्यांना कुणाला धमक्या आल्या असतील अशा मंडळींनी घाबरुन न जाता महानिरिक्षक, पोलिस अधीक्षक किंवा माझ्याकडे गोपनीय तक्रारी कराव्यात. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असे आवाहन पालकमंत्री अशोकराव चव्हाण ( Ashok Chavhan) यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटणकर, विशेष पोलिस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, एसआयटीचे प्रमुख अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासोबत बैठकीनंतर पालकमंत्री चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नागरीकांच्या मनात सुरक्षिततेची भावना रहावी यासाठी पोलिसांना सुचना दिल्या आहेत. बियाणी यांच्या हत्येनंतर भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ज्या व्यावसायिक, उद्योगपती किंवा अन्य मंडळींना धमक्या आल्या असतील त्यांनी न घाबरता तक्रारी कराव्यात. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तपासासाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे. हत्येमागचे कारण आणि सूत्रधार कोण? हा मूळ प्रश्न आहे. त्यामुळे आताच अंदाज व्यक्त चूकीचे होईल.
बियाणी कुटुंबियांची खाजगीत भेटपालकमंत्री चव्हाण म्हणाले, बियाणी कुटुंबियांची मी स्वता अन् विशेष पोलिस उपमहानिरिक्षक, पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक हे खाजगीत भेट घेणार आहोत. त्यांना याबाबत जी काही माहिती द्यायची आहे. त्यांनी ती द्यावी. ही भेट खाजगी स्वरुपात राहणार आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासात मदत होईल.
गृहमंत्र्यांची भेट घेणारगुरुवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस महासंचालक यांची मुंबईत भेट घेणार आहे. या भेटीत त्यांना नांदेडातील परिस्थितीची माहिती देणार आहे. त्यावर गृहमंत्री काय तो निर्णय घेतील असेही चव्हाण म्हणाले.